बुलढाणा जिल्हा गुन्हे वृत्त: अत्याचार, चाकू हल्ला आणि आत्महत्येच्या घटनांनी जिल्हा हादरला; जिल्ह्यातून तीन जण बेपत्ता

अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी आणि दुर्दैवी घटनांची मालिका पाहायला मिळाली. खामगाव येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जळगाव जामोद येथे मजुरीच्या पैशांवरून प्राणघातक चाकू हल्ला, तर शेगाव व मोताळा तालुक्यात दोन तरुणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याशिवाय, जिल्ह्यातून तीन नागरिक बेपत्ता झाल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत अपहरणाचा गुन्हा आणि मिसिंग दाखल करण्यात आल्या आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार व जिवे मारण्याची धमकी
खामगाव: खामगाव तालुक्यातील पारखेड येथे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची आणि रात्रभर डांबून ठेवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ६ ऑगस्टच्या रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी लखन रवींद्र बांगर (वय ३२ वर्षे) रा. पारखेड) याच्याविरुद्ध खामगाव पोलीस ठाण्यात पॉक्सो कायदा व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक राची पुसाम या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
मजुरीच्या वादातून पोटात भोसकला चाकू
जळगाव जामोद: जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे मजुरीच्या पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. आरोपी अनिल बळीराम उर्फ बाळू भगेवार (वय २८ वर्षे) याने ८ ऑगस्ट रोजी सकाळी तक्रारदाराच्या दिरला शिवीगाळ करत, ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटावर चाकूने वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, जळगाव जामोद पोलिसांनी आरोपीविरुद्ध बीएनएस कलम १०९, ३५२, ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
शेगाव व तपोवन येथे दोन तरुणांची आत्महत्या
शेगाव: शहरातील गणेश नगर येथे राहुल राजू सोनोने (वय २७) याने ८ ऑगस्ट रोजी दुपारी घरात कोणी नसताना दारूच्या नशेत लाकडी बल्लीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.
धामणगाव बढे: पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन (ता. मोताळा) येथे राजू गुलाबराव शिकारे (वय ३८) याने गावातील मारुती मंदिराच्या सभामंडपातील लोखंडी गजाला दोरीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यातून तीन जण बेपत्ता
 खामगाव शहर: चांदमारी भागातून एक २१ वर्षीय तरुणी ७ ऑगस्ट रोजी सकाळी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली. नातेवाइकांनी शोध घेऊनही ती न मिळल्याने खामगाव शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
देऊळगाव राजा: पिंपळनेर येथील एक २४ वर्षीय तरुण २१ मे रोजी ‘छत्रपती संभाजीनगर येथे कामाला जातो’ असे सांगून निघाला होता. मात्र, तो आजपर्यंत घरी न परतल्याने व त्याचे मोबाईल बंद असल्याने त्याच्या आईच्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
खामगाव ग्रामीण: जळका तेली येथील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा ७ ऑगस्ट रोजी ‘बाहेरून कचोरी खाऊन येतो’ असे सांगून घरून निघाला, मात्र तो परत आला नाही. अल्पवयीन मुलाला अज्ञाताने पळवून नेल्याच्या संशयावरून खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!