बुलढाणा हादरला! नांदुऱ्यात घरफोडीदरम्यान भीषण हत्याकांड; चोरांचा पाठलाग करणाऱ्या शेतकऱ्याची निघृण हत्या, ५ भामटे फरार!

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): नांदुरा तालुक्यातील काटी गावात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोड्यांनी धुमाकूळ घालत एका ५२ वर्षीय शेतकऱ्याचा अत्यंत निघृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरांना पकडण्यासाठी धाव घेतलेल्या रायसिंग सिताराम सोळंकी यांच्यावर चोरट्यांनी आधी काठीने आणि नंतर चाकूने सपासप वार करून त्यांना जिवानिशी मारले. या रक्तांळलेल्या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरून गेला असून परिसरात प्रचंड संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे २ ते २.३० वाजेच्या सुमारास मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या काटी (ता. नांदुरा) येथे ४ ते ५ अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. भामट्यांनी गावातील घरे आणि दुकानांवर एकाच वेळी धाड टाकून लुटालूट सुरू केली. दरम्यान, शेजारीच एका गोठ्यात बसलेले शेती आणि दुग्धव्यवसाय करणारे रायसिंग सिताराम सोळंकी (वय ५२, रा. काटी, जात- पारधी समाज) यांना या चोरट्यांची चाहूल लागली. त्यांनी प्राणाची पर्वा न करता चोरांचा पाठलाग सुरू केला. रायसिंग सोळंकी पाठीमागे येत असल्याचे पाहताच एका चोरट्यांनी त्यांच्या पाठीमागून काठीने जबर वार केला. त्यामध्ये सोळंकी खाली कोसळताच इतर चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सोळंकी यांनी मोठ्याने आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. गावकरी जमा होत असल्याचे पाहून सर्व ४ ते ५ चोरटे पुढे पळत गेले आणि आधीच उभ्या करून ठेवलेल्या मोटरसायकलवर बसून अंधाराचा फायदा घेत फरार झाले.

घरे आणि दुकानांत मोठी लुटालूट

चोरट्यांनी काटी गावात मोठ्या तयारीनिशी येऊन ३ ठिकाणी चोरी केली. यामध्ये बाळू हरिश्चंद्र घोंगे यांच्या घरातून सोन्याचे मौल्यवान दागिने लंपास केला. संजय रामभाऊ हिवाळे यांच्या दुकानातून साड्या आणि मोठी रोख रक्कम पळवली. तर गणेश मानसिंग राठोड यांच्याही घरी घरफोडी केली. एकूण किती लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला, याचा अचूक आकडा अद्याप समोर आला नसून सध्या घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून ठसे तज्ज्ञ पुरावे गोळा करत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. या मध्यरात्रीच्या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल; डॉग स्क्वॉड अन् फिंगरप्रिंट टीम सक्रिय

घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या रायसिंग सोळंकी यांना गावकऱ्यांनी तातडीने शासकीय दवाखाना, मलकापूर येथे दाखल केले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सुनील रतनसिंग चव्हाण यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांना फोनवरून तत्काळ माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख हेमंत ठाकरे, डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि ॲनालिसिस टीम तातडीने काटी गावात दाखल झाली आहे. चोरट्यांच्या शोधार्थ वेगवेगळे पथक रवाना करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!