मलकापूर शहरात ‘एलसीबी’चा धडाकेबाज छापा; गोपाळकृष्ण नगरातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!; पुणे व सोलापूरच्या दोन पीडित महिलांची सुटका; दोन दलालांना बेड्या, ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा आणि मलकापूर शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने गोपाळकृष्ण नगर येथील हेलोटे अपार्टमेंटमध्ये चालणाऱ्या बेकायदेशीर देहविक्रीच्या अड्ड्यावर अचानक धाड टाकून एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
गोपाळकृष्ण नगर, हेलोटे अपार्टमेंट परिसरातील स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी चालणाऱ्या संशयास्पद आणि अनैतिक प्रकारांबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस पथकाने ८ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास नमूद ठिकाणी अचानक छापा टाकला. धाडीदरम्यान पोलीस पथकाला घटनास्थळी संशयित आरोपी आणि पीडित महिला आढळून आल्या.
या प्रकरणी स्थागुशाच्या महिला पोलीस अंमलदार दीपाली चव्हाण यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांत अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास मलकापूर शहर ठाणेदार गणेश गिरी स्वतः करत आहेत.
पुणे आणि सोलापूरच्या महिलांची देहविक्रीसाठी तस्करी
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पीडित महिलांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली असता, मुख्य आरोपींनी त्यांना देहव्यवसाय करण्यासाठी या ठिकाणी आणल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईत पोलीस पथकाने घटनास्थळावरून आणि आरोपींच्या ताब्यातून पाच मोबाइल फोन (किंमत ९० हजार रुपये), नगदी रोकड (१ हजार ५०० रुपये), कंडोम पाकीट (किंमत ९० रुपये), मेकअपचे साहित्य (किंमत ३७० रुपये), असा एकूण ९१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!