पुष्कर मानकर
अकोला,(प्रतिनिधी): ‘लाचलुचपत’ थांबण्याचे नाव घेत नाहीये, पण अकोला एसीबीने मात्र अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणून सोडले आहेत. अकोला पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील एका महिला कनिष्ठ अभियंत्याला ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडून एसीबीने भ्रष्टाचाराच्या मुळावर घाव घातला आहे. श्रीमंतीच्या हव्यासापोटी जनतेच्या कष्टाचा पैसा हडपणाऱ्या या महिला लोकसेवकाच्या मुसक्या आवळल्याने जिल्ह्यात एकच खळबळबळ उडाली आहे.
एकीकडे सरकार पारदर्शक कारभाराचा दावा करत असताना, दुसरीकडे सरकारी खुर्च्यांवर बसलेले काही अधिकारी सर्वसामान्यांचे रक्त शोषण्याचे काम करत आहेत. या प्रकरणातील तक्रारदाराने सन २०२४ मध्ये ११० मीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण केले होते. नियमानुसार, काम पूर्ण झाल्यावर त्याचे देयक (Bill) मिळणे हा तक्रारदाराचा हक्क होता. मात्र, हे बिल काढून देण्याच्या बदल्यात आरोपी महिला लोकसेवक श्रीमती जया पांडुरंग इंगोले (वय ४९ वर्षे, कनिष्ठ अभियंता) यांनी चक्क ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
आपल्या हक्काच्या पैशांसाठी लाच देणे तक्रारदाराला मान्य नव्हते. भ्रष्टाचाराला खतपाणी न घालता त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अकोला यांच्याकडे धाव घेतली आणि २७ एप्रिल २०२६ रोजी रीतसर तक्रार नोंदवली.
एसीबीचे चक्रव्यूह आणि ‘तिचा’ माज उतरला!
तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने अत्यंत गोपनीयतेने हालचाली सुरू केल्या. २८ एप्रिल २०२६ रोजी शासकीय पंचांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. या पडताळणी दरम्यान, श्रीमती जया इंगोले यांनी कामाचा मोबदला म्हणून ३० हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेची मागणी सिद्ध होताच एसीबीने सापळा रचला. आज, ३० एप्रिल २०२६ रोजी, अकोला पंचायत समितीच्या बांधकाम विभागातच हा थरार घडला. दुपारी ११.२७ ते १२.०४ च्या दरम्यान, जेव्हा आरोपी जया इंगोले यांनी तक्रारदाराकडून लाचेची ३० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली, त्याच क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांच्यावर झडप घातली. रंगेहात पकडल्या गेल्याने या महिला अधिकाऱ्याची बोलतीच बंद झाली. ज्या हातातून जनतेच्या विकासाच्या फाईल्सवर सह्या व्हायला हव्या होत्या, त्याच हातात आता बेड्या पडल्या आहेत. सध्या आरोपी श्रीमती जया इंगोले यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस स्टेशन, अकोला येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईने हे सिद्ध केले आहे की, मग ती महिला अधिकारी असो वा पुरुष, भ्रष्टाचाराच्या वाटेवर चालणाऱ्याची जागा ही तुरुंगातच आहे.
भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ: ‘ही’ टीम ठरली यशस्वी
अकोला एसीबीने केलेल्या या धडाकेबाज कारवाईमुळे शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही कारवाई बापू बांगर (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. अमरावती परिक्षेत्र), सचिंद्र शिंदे (अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. अमरावती परिक्षेत्र), मिलींदकुमार अ. बहाकर (पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. अकोला) यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवादार अर्चना घोडेस्वार, भाग्यश्री काशीद, दिगांबर जाधव, अविनाश पाचपोर, अस्लम शाह, नितीन पाटील आणि चालक नफीस शेख यांनी केली.
जनतेचा पैसा खाणाऱ्यांनो सावधान!
सध्या आरोपी श्रीमती जया इंगोले यांच्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस स्टेशन, अकोला येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईने हे सिद्ध केले आहे की, मग ती महिला अधिकारी असो वा पुरुष, भ्रष्टाचाराच्या वाटेवर चालणाऱ्याची जागा ही तुरुंगातच आहे. कोणत्याही शासकीय कामासाठी जर कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी लाचेची मागणी करत असेल, तर त्याला बळी पडू नका. लाच देणे आणि घेणे दोन्ही गुन्हा आहे. अशा भ्रष्ट प्रवृत्तींची तक्रार त्वरित अकोला एसीबीसी सोबत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.