कायद्याचा धाक संपला? भीमजयंतीच्या जल्लोषात रक्ताचा सडा; अनैतिक संबंधाच्या वणव्यात तरुणाचा निर्घृण बळी!

अजय टप

बुलढाणा, (प्रतिनिधी): एकीकडे संपूर्ण देश महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या उत्सवात न्हाऊन निघाला होता, ज्या रात्री निळ्या वादळाचा जयघोष बुलढाण्याच्या गल्लीबोळात घुमत होता, त्याच रात्री शहराच्या मध्यवस्तीत एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक हत्याकांड घडले. जुन्या वादाची ठिणगी आणि अनैतिक संबंधांतून निर्माण झालेला द्वेष इतका टोकाला गेला की, एका तरुणाला भरचौकात गाठून त्याच्या पाठीत धारदार चाकू खुपसून त्याची जीवनयात्रा संपवण्यात आली. सागर ऊर्फ पप्पू जाधव (वय ३८ वर्षे) या तरुणाचा या हल्ल्यात करुण अंत झाला असून, या घटनेने बुलढाणा शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. कायदेव्यवस्थेचा धाक उरला नाही की काय? असा संतप्त सवाल आता या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.

बुलढाणा शहर १४ एप्रिल रोजी भीमसैनिकांच्या उत्साहाने रसरसलेले होते. भीमनगर येथील वार्ड नंबर २ मध्ये राहणारा सागर जाधव हा देखील आपल्या मोहल्ल्यातील मित्रांसोबत सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडला. घरात वृद्ध आई, पत्नीशी पटत नसल्याने एकाकी पडलेला मुलगा आणि सुखी संसाराची स्वप्ने पाहणारा परिवार… कोणालाही कल्पना नव्हती की सागरसाठी ही शेवटची रात्र ठरणार आहे. रात्रीचे साडेकरा वाजले होते. जयस्वाल चौकात मिरवणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. वाद्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज आणि गुलालाची उधळण सुरू असतानाच, मागावर असलेल्या सोनू जाधव (रा. भिलवाडा) याने गर्दीचा फायदा घेऊन आपल्या कमरेचा धारदार चाकू काढला आणि काही कळायच्या आत सागरच्या पाठीत सपासप वार केले. चाकू इतक्या वेगाने आणि ताकदीने खुपसला की, सागरला प्रतिकार करण्याची साधी संधी देखील मिळाली नाही. सागर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला आणि आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर काही क्षणातच किंकाळ्यांमध्ये झाले.

मृत सागर जाधव याचे आरोपी सोनू जाधवच्या नात्यातील एका महिलेसोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ही बाब सोनूच्या मनात विष कालवत होती. आपल्या रक्ताच्या नात्यातील महिलेचे दुसऱ्या व्यक्तीसोबत असलेले संबंध सोनूच्या जिव्हारी लागले होते. याच रागातून सोनूने यापूर्वीही अनेकदा सागरला लोकांसमोर अपमानित केले होते आणि मारहाणही केली होती. “आज ना उद्या मी तुझा काटा काढल्याशिवाय राहणार नाही,” अशी उघड धमकी सोनूने दिली होती. सागरने यापूर्वी पोलीस स्टेशन गाठून तक्रारही दिली होती. नात्यातील महिलेच्या चारित्र्यावर संशय आणि समाजात होणारी बदनामी यातून निर्माण झालेल्या सुडाच्या भावनेने सोनूचा ताबा घेतला आणि त्याने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याचे बोलल्या जात आहे.

घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवी राठोड आणि पोलीस अंमलदार कयूम शेख यांनी तातडीने फौजफाट्यासह घटनास्थळ आणि रुग्णालय गाठले. मिरवणुकीच्या बंदोबस्तात असतानाच घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांचीही मोठी धाडपड झाली. रुग्णालयाबाहेर भीमनगरच्या नागरिकांचीही मोठी गर्दी जमली होती. डॉक्टरांनी सागरला मृत घोषित करताच त्याच्या आईचा आक्रोश ऐकून उपस्थितांचे काळीज पिळवटले. ३८ वर्षांचा तरुण मुलगा, ज्याच्या खांद्यावर संपूर्ण घराची जबाबदारी होती, तो अशा प्रकारे रक्ताच्या थारोळ्यात संपलेला पाहून प्रत्येक डोळा पाणावल्याचे दिसून आले. आरोपी सोनू जाधव याने जाणीवपूर्वक मिरवणुकीची वेळ निवडल्याचे बोलल्या जात असून ही हत्या पूर्वनियोजित कटानुसार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नागरिकांमधून पोलिसांप्रती संताप

सागरने यापूर्वीच आपल्या जीविताला धोका असल्याची तक्रार दिली होती, तर पोलिसांनी सोनूला वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई करून जेलची हवा का दाखवली नाही? जर वेळीच पावले उचलली असती, तर आज एक आई आपल्या तरुण मुलाला आणि एक मुलगा आपल्या वडिलांना मुकला नसता. पोलिसांच्या याच दुर्लक्षामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढते आणि ते भरचौकात हत्या करण्यापर्यंत मजल मारतात, असा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

बुलढाण्यात कायद्याचा धाक संपला?

बुलढाण्यासारख्या शांत शहरात भरचौकात झालेल्या या खुनामुळे कायद्याचा धाक राहिला नाही का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. रक्ताने माखलेली ही जयंती बुलढाणेकर कधीही विसरू शकणार नाहीत. या घटनेमुळे भिलवाडा आणि भीमनगर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. आरोपीने केवळ एका व्यक्तीचा खून केला नाही, तर माणुसकी आणि सार्वजनिक उत्सवाच्या पवित्र्यालाही काळिमा फासला आहे. आता न्यायदेवता या नराधमाला काय शिक्षा सुनावते, यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

One thought on “कायद्याचा धाक संपला? भीमजयंतीच्या जल्लोषात रक्ताचा सडा; अनैतिक संबंधाच्या वणव्यात तरुणाचा निर्घृण बळी!

  1. बुलढाणा शहरातील ही काही पहिलीच घटना नाही यापूर्वीसुद्धा रॅलीतून उचलण्याची घटना घडली आहे तर खून सुद्धा घडलेला आहे मग रॅलीमध्ये उपाययोजना का करण्यात येऊ नये काही कर्मचारी तर असे उभे राहतात जसे कोणाला काहीच घेऊन देणार नाही कर्तव्याचा विसर पडतो मागील कुणाच्या वेळी तर ॲम्बुलन्स ड्रायव्हर वेळेवर पोहोचू शकला नाही ॲम्बुलन्स असून सुद्धा

Leave a Reply to Prashant Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!