अजय टप
जलंब,(प्रतिनिधी): शेगाव तालुक्यातील जळंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आमसरी येथे एका धार्मिक चोरीची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातील श्रद्धास्थान असलेल्या हनुमानजींच्या सार्वजनिक मंदिरातील सुमारे ८२,८०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने आणि आभूषणे अज्ञात चोरट्याने नव्हे, तर गावातीलच एका तरुणाने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळंब पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
आमसरी गावातील कमानीजवळ हनुमानजींचे जुने आणि सार्वजनिक मंदिर आहे. या मंदिरात ग्रामस्थांची मोठी श्रद्धा असून, मूर्तीला विविध चांदीचे अलंकार चढवण्यात आले होते. ३१ डिसेंबर २०२५ च्या रात्री १० वाजेपासून ते २८ मार्च २०२६ च्या रात्री ९.३० वाजेदरम्यानच्या कालावधीत ही चोरी झाली. सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आले नाही, मात्र दागिन्यांची पडताळणी केली असता मूर्तीवरील महत्त्वाचे अलंकार गायब असल्याचे दिसून आले. मंदिराच्या गाभाऱ्यातून चोरट्याने चांदीचा मुकुट वजन २.५ किलो (किंमत अंदाजे ४५,००० रुपये), मुखाचा मुखवटा वजन १.७२५ किलो (किंमत अंदाजे ३१,५०० रुपये), चांदीचे डोळे वजन ५० ग्रॅम (किंमत अंदाजे १,८०० रुपये), लंगोडबंद (छातीवरील पट्टी) वजन २५० ग्रॅम (किंमत अंदाजे ४,५०० रुपये), असा एकूण ८२,८०० रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता.
या घटनेमुळे आमसरी परिसरात संतापाची लाट उसळली होती. अखेर गावातील ज्येष्ठ नागरिक आणि शेतमजूर पुरुषोत्तम मधुकर कुटे (वय ६५ वर्षे) यांनी जलंब पोलीस स्टेशन गाठून याप्रकरणी रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली. संशयाच्या सुईवरून पोलिसांनी गावातीलच मंगेश उर्फ शिवशंकर अभिमन्यू कुटे (वय २७ वर्षे) या तरुणाला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम ३३४ (१) आणि ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील पोलीस अंमलदार सचिन बावणे करीत आहेत.
आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
धार्मिक स्थळावरील चोरी असल्यामुळे पोलिसांनी अत्यंत गुप्तपणे माहिती काढली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी मंगेश कुटे याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने चोरीची कबुली दिल्याची प्राथमिक माहिती आहे. चोरीला गेलेले चांदीचे दागिने त्याने कुठे विकले किंवा लपवून ठेवले आहेत, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. या घटनेमुळे मंदिर प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज व्यक्त केली आहे.