https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

नांदुऱ्यात विनापरवाना ‘देशी कट्टा’ बाळगणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

अजय टप

नांदुरा,(प्रतिनिधी): शहरात अवैध शस्त्रास्त्रांच्या विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नांदुरा पोलीस स्टेशनच्या पथकाने एका गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून सापळा रचून, पेठ मोहल्ला परिसरात एका आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक देशी बनावटीचा कट्टा (पिस्तूल) आणि एक विना क्रमांकाची दुचाकी, असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बुधवार, दिनांक २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशन नांदुरा येथील पथक गस्तीवर असताना, फिर्यादी पोलीस अंमलदार पंकजसिंग डाबेराव यांना एका संशयास्पद हालचालीची माहिती मिळाली. पेठ मोहल्ला भागातील एका इसमाकडे बेकायदेशीर शस्त्र असल्याची पक्की खबर मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. पोलिसांनी आरोपी ताहेर अहमद जमीर अहमद (वय ३४ वर्षे) रा. पेठ मोहल्ला (नांदुरा) याला त्याच्या राहत्या घरासमोर गाठले. त्याची निळ्या रंगाची विना नंबरची सुझुकी ॲक्सेस (बर्गमन) कंपनीची स्कुटी तपासली असता, डिक्कीमध्ये पोलिसांना लोखंडी आणि स्टील कोटिंग असलेला मेड इन युएसए लिहिलेला गावठी कट्टा (पिस्तूल) मिळून आला. पोलिसांनी कट्टा आणि विना क्रमांकाची सुझुकी बर्गमन स्कुटी जप्त केली आहे.

आरोपी ताहेर अहमद याने हा कट्टा कोणत्या उद्देशाने जवळ बाळगला होता आणि तो त्याने कोठून खरेदी केला, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या प्रकरणी फिर्यादी पंकजसिंग डाबेराव यांच्या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३, २५ शस्त्र अधिनियम सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलींद जवंजाळ करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!