अजय टप
खामगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): खामगाव येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने एक मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. घराचे कुलूप उघडून कपाटातील तब्बल ५ लाख २० हजार रुपयांची नगदी रोकड लंपास करणाऱ्या चोराला पोलिसांनी जेरबंद केले असून, चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

शिवाजीफैल (खामगाव) येथील रहिवासी फिर्यादी योगेश प्रभाकर केवारे (वय ४० वर्षे) हे १ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने घराला कडी लावून बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोराने त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातील लॉकरचे कुलूप उघडून त्यात ठेवलेली ५ लाख २० हजार रुपयांची नगदी रक्कम चोराने चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिताचे कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान मिळालेले तांत्रिक व भौतिक पुरावे तसेच गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांनी शिवाजीफैल येथीलच रहिवासी असलेला संशयित इसम ओम अनिल माने याला ताब्यात घेतले. पोलिस स्टेशनमध्ये आणून त्याची कसून चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी ९ जून रोजी रात्री त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपी ओम अनिल माने याच्या ताब्यातून गुन्ह्यातील चोरीला गेलेली संपूर्ण ५ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
या पोलिस पथकाची दमदार कामगिरी
ही यशस्वी कारवाई बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोंढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्या नेतृत्वात पोउपनि अमित तळोले, पोलीस अंमलदार संदिप टाकसाळ, देवेंद्र शेळके, निलसिंग चव्हाण, प्रविण गायकवाड, केशव झालटे, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा कदम, पोलीस अंमलदार नितीन भालेराव यांनी पार पाडली.
