मलकापूर ग्रामीण हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; अवैध देशी दारूची वाहतूक करणारा आरोपी जेरबंद, ९३ हजारांचा मुद्देमाल जप्त!

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यातील अवैध व विनापरवाना दारू विक्री, चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून अवैध धंदे समूळ नष्ट करण्याचे आदेश बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक तांबे यांनी दिले होते. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेने आज ९ जून रोजी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशिष रोही यांनी वरिष्ठांच्या सूचनेनुसार विशेष पथके तयार केली होती. दरम्यान, ९ जून रोजी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम त्याच्या मोटार सायकलवरून अवैधरित्या व विनापरवाना देशी दारूची चोरटी वाहतूक करत आहे. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्परता दाखवत उमाळी शिवारात सापळा रचून नाकाबंदी केली. दरम्यान पोलिसांनी संशयित मोटार सायकल थांबवून तपासणी केली. यावेळी आरोपी मोहन नयनसिंग जाधव (वय ३७ वर्षे) रा. गिरणी (ता. मलकापूर) हा मोटार सायकलवर विनापरवाना देशी दारूची वाहतूक करताना रंगेहात पकडला गेला. पोलिसांच्या पथकाने त्याच्याकडून देशी दारूचे १० बॉक्स (किंमत ४३ हजार २०० रुपये), एक मोटार सायकल (किंमत ५० हजार रुपये), असा एकूण ९३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी मोहन जाधव याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण येथे महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास मलकापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि रोही यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस अंमलदार गजानन दराडे, जगदेव टेकाळे, दिनेश बकाले, युवराज राठोड, पूजा साळवे, कोमल इंगळे आणि मनोज खरडे यांनी सदर कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!