अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ ते ४८ तासांत कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का देणाऱ्या तीन वेगवेगळ्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील नांदुरा, धाड आणि शेगाव शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात सांडपाण्याच्या किरकोळ कारणावरून एका ५० वर्षीय दलित महिलेला झालेली अमानुष मारहाण, गावातील रस्त्यावरून ट्रॅक्टर नेण्याच्या वादातून थेट तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची दिलेली धमकी आणि स्वतःच्या मालकीची नसलेली ‘ओला’ ई-स्कूटर विकून केलेली १ लाख ३१ हजारांची आर्थिक फसवणूक या घटनांचा समावेश आहे.
नांदुरा: नांदुरा पोलीस ठांतर्गत येणाऱ्या दहीगाव येथे शेजाऱ्यांमधील अंतर्गत वाद रक्ताळला आहे. फिर्यादी सखुबाई रामधन जवरे (वय ५० वर्षे) रा. दहीगाव (ता.नांदुरा, जि.बुलढाणा) या दिनांक १ जून रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास आपल्या घरासमोर हजर होत्या. याच वेळी त्यांच्याच गावात राहणारे आरोपी सुनिल प्रल्हाद जवरे हे त्यांच्या घरातील वापराचे सांडपाणी फिर्यादी सखुबाई यांच्या जागेकडे काढत होते.
यावर फिर्यादीने आक्षेप घेत, “तुझे वापराचे पाणी हे आमच्या जागेत येईल, तू तुझे वापराचे पाणी आमच्या जागेकडे काढून नको”, असे समजावून सांगितले. मात्र, या किरकोळ कारणाचा राग मनात धरून आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. तक्रारीनुसार, आरोपी सुनील प्रल्हाद जवरे व आरोपी छायाबाई सुनिल जवरे या दोघांनी फिर्यादी सखुबाई यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच छायाबाई हिने फिर्यादीच्या डोक्याचे केस ओढले, तर मुख्य आरोपी सुनिल जवरे याने फिर्यादीचा डावा हात पकडून त्याची बोटे अत्यंत क्रूरपणे पिरगाळली. त्यानंतर आरोपींचे दोन मुले चरण सुनिल जवरे व सिद्धार्थ सुनिल जवरे हे त्या ठिकाणी धावून आले आणि त्यांनी फिर्यादी सखुबाई यांच्या कमरेत लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. मारहाण करत असताना आरोपी सुनिल जवरे हा फिर्यादीला “तू वेश्या आहेस…”, असे म्हणत त्यांची प्रतिमा मलिन केली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या रिपोर्टवरून नांदुरा पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार जाधव हे करीत आहेत.
धाड: धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढंगारपूर येथे सार्वजनिक रस्त्यावरून ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून गावात मोठी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फिर्यादी ऋषिकेश गुलाबराव कोरडे (वय २६ वर्षे) रा. ढंगारपूर, ता.जि. बुलढाणा हे २ जून रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास गावात हजर होते. त्या वेळी गावातीलच आरोपी विष्णू रंगनाथ कोरडे हा दगड आणि मुरुमाने पूर्ण भरलेले ट्रॅक्टर गावातील वस्तीतून घेऊन जात होता. रात्रीची वेळ असल्याने फिर्यादी ऋषिकेश आणि इतर गावकऱ्यांनी आरोपीला मुरुमाने भरलेले ट्रॅक्टर गावातील अरुंद रस्त्यावरून न नेता गावाबाहेरील पांधीतून न्यावे, असा सल्ला दिला. गावकऱ्यांनी दिलेल्या या सल्ल्याचा आरोपी विष्णू कोरडे याला प्रचंड राग आला. त्या कारणावरून आरोपी विष्णू रंगनाथ कोरडे आणि त्याचा मुलगा आरोपी रणजित विष्णू कोरडे या दोघांनी घरातून धारदार तलवार आणली आणि फिर्यादी ऋषिकेश याला जिवाने मारण्याची धमकी दिली.
इतकेच नव्हे तर, आरोपी रणजित विष्णू कोरडे याने अत्यंत अश्लील आणि जाहीर शिवीगाळ करत, “एका एकाच्या मायच्या गांडीत गोळी घालीन”, अशी धमकी देऊन परिसरात बंदुकीची दहशत असल्याचा आव आणला. या दरम्यान आरोपी शंकर विष्णू कोरडे आणि आरोपी भारत शिवाजी कोरडे यांनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली आणि “तुझ्या अंगावर थेट ट्रॅक्टर घालतो, तुला जिवाने मारून टाकतो आणि तलवारीने कापून काढतो” अशा धमक्या दिल्या. याप्रकरणी धाड पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम जाधव हे करीत आहेत.
शेगाव: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शेगाव शहरात एक मोठी आर्थिक फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी विष्णू अशोक गारमोडे (वय २६ वर्षे) रा.सुरभी कॉलनी, अकोट रोड, शेगाव, ता. शेगाव, जि. बुलढाणा यांना आरोपी गोपाल शंकर गायकवाड (वय ४० वर्षे) रा. जयअंबे नगर, आईस फॅक्टरी जवळ, शेगाव याने मोठ्या चालाखीने फसवले. व्यवहारानुसार, आरोपी गोपाल याने ओला कंपनीची इलेक्ट्रिक गाडी क्रमांक एमएच-२८-बीव्ही-७०२९ ही फिर्यादीला विकण्याचे ठरवले. ही गाडी स्वतःच्या मालकीची नसतानाही, केवळ फिर्यादीची आर्थिक फसवणूक व्हावी या उद्देशाने आरोपीने फिर्यादीकडून वेळोवेळी एकूण १ लाख ३१ हजार रुपये उकळले. हा व्यवहार दिनांक ८ डिसेंबर २०२३ ते ७ सप्टेंबर २०२५ या प्रदीर्घ कालावधीत शिवाजी चौक, शेगाव येथे पार पडला.
पैसे घेतल्यानंतरही आरोपी गाडी नावावर करून देण्यास टाळाटाळ करत होता. काही दिवसांनंतर, एचडीएफसी बँक शाखा खामगावचे वसुली कर्मचारी अचानक शिवाजी चौकात आले आणि त्यांनी फिर्यादी विष्णू गारमोडे यांच्या ताब्यातील ती ओला गाडी जप्त केली. बँकेकडून चौकशी केली असता फिर्यादीला मोठा धक्का बसला; कारण त्या गाडीवर बँकेचे संपूर्ण कर्ज थकीत होते आणि ती गाडी आरोपी गोपाल गायकवाडच्या नावावर नसून, त्याची पत्नी गंगा गोपाल गायकवाड हिच्या नावावर असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसात धाव घेतली होती, मात्र गुन्हा दाखल होण्यास विलंब झाला. अखेर फिर्यादी विष्णू गारमोडे यांनी विद्वान न्यायालय, शेगाव येथे धाव घेतली. न्यायालयासमोर सर्व पुरावे सादर केल्यानंतर, न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनी संदीप बारिंगे हे करीत आहेत.
