मलकापुरात संतापजनक! लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; पीडिता गर्भवती

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर परिसरातून पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी आणि समाजमनाला सुन्न करणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका २६ वर्षीय नराधमाने १७ वर्षांच्या निष्पाप, अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिच्या असहायतेचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पाशवी अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली असून, हा प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी विशाल (वय २६ वर्षे) रा. बेलाड, ता. मलकापूर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगी ही अवघी १७ वर्षांची असून ती मलकापूर तालुक्यातील बेलाड गावची रहिवासी आहे. तिचे शिक्षण अवघे दहावीपर्यंत झाले असून ती घरात आपल्या आई आणि लहान भावंडांसोबत अत्यंत गरिबीत राहत होती. कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्याने आणि घरात वडिलांचे छत्र नसल्याने ही मुलगी अत्यंत साध्या वातावरणात जगत होती. याच गोष्टीचा फायदा गावातीलच २६ वर्षीय विशाल नामक तरुणाने घेतला.

जानेवारी २०२६ पासून आरोपी विशाल याने या अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. तिला गोड गोड बोलून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ‘लहान वय’ असल्याने आरोपीच्या डोक्यातील हिंस्र आणि वासनांध विचार या निष्पाप मुलीला ओळखता आले नाहीत. आरोपी विशाल तिला गावात आणि गावाबाहेरील एका निर्जन, पडीक जागेत नेऊन भेटत असे. याच पडीक जागेचा फायदा घेत आरोपीने पीडितेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर जानेवारी २०२६ ते जून २०२६ दरम्यान तब्बल ५ ते ६ वेळा बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अत्याचारानंतर पीडित मुलगी प्रचंड मानसिक दडपणाखाली वावरत होती. मात्र, मागील १५ दिवसांपासून तिच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. तिला सतत उलट्या होणे, चक्कर येणे आणि मळमळ होणे अशा त्रासाला सामोरे जावे लागत होते. मुलीची बिघडती प्रकृती पाहून तिच्या आईला संशय आला. आईने तात्काळ तिला मलकापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी पीडितेची प्राथमिक तपासणी करून तिचे रक्त आणि लघवीचे नमुने तपासणीसाठी घेतले. या तपासणीचा अहवाल समोर येताच डॉक्टरांसह पीडितेच्या पायाखालची जमीनच सरकली. ती अवघ्या १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पीडितेला आणि तिच्या आईला पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात पाठवले. ५ जून रोजी पहाटे ३.१६ वाजता पीडितेला बुलढाणा सरकारी रुग्णालयात भरती करण्यात आले, जिथे तिची प्रकृती स्थिर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

पीडित मुलीने बुलढाणा सरकारी रुग्णालयात पोलिसांसमोर आपला तोंडी जबाब नोंदवला. या जबाबाच्या आधारे मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी विशाल याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ६४(२), (एम), पोक्सो कायद्याचे सहकलम ४, ५(जे)(२), ५(एल), ६, आणि ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झेंडगे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!