बुलढाण्यात जबरी चोरी करणाऱ्या कुख्यात गुंडांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; परस्पर विरोधी गुन्हे दाखल!

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):बुलढाणा शहर पोलिसांनी एका जबरी चोरीच्या प्रकरणात धडक कारवाई करत कुख्यात आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. ४ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला करून रोख रक्कम लुटण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असून, आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शहरातील इंदिरानगरमध्ये राहणारे सिद्धार्थ महादेव दांडगे (वय ३९ वर्षे) हे ४ जून २०२६ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घरून संगम चौकात जात होते. यादरम्यान हॉटेल कृष्णा समोर कुख्यात आरोपी विकास उर्फ लड्ड्या गणेश निर्मळे (वय २७ वर्षे) आणि विठ्ठल अशोक गायकवाड (वय २४ वर्षे) दोघे रा. इंदिरानगर, बुलढाणा) यांनी त्यांना अडवले व दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली.

सिद्धार्थ यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, दोन्ही आरोपींनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले आणि त्यांच्या खिशातील १ हजार ६०० रुपये जबरीने हिसकावून घेतले. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९ (६) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याच घटनेच्या संदर्भाने आरोपी विकास उर्फ लड्ड्या गणेश निर्मळे (वय २७ वर्षे) याने देखील सिद्धार्थ महादेव दांडगे याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी सिद्धार्थ दांडगे याच्यावर कलम ३०९ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बुलढाणा शहर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून तिन्ही कुख्यात आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यातील लुटलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सर्व आरोपींचा गुन्हेगारी पार्श्वभूमी इतिहास असून, त्यांना ५ जून रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली. उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संग्राम पाटील, पोउपनि. रवि मोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय नागरे आणि शिवहरी सांगळे यांनी सदर कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!