बुलढाणा जिल्हा गुन्हेगारी वृत्त: मारहाण, विनयभंग, आत्महत्या आणि बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये वाढ; पोलीस तपासाला वेग

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): गेल्या दोन ते तीन दिवसांत बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारी आणि काही अत्यंत दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. यामध्ये रस्ता वाद, कोर्टातील केस मागे घेण्यासाठी धमकावणे, घातक हत्यारांनी मारहाण करणे यासह विनयभंग, आत्महत्या आणि तरुणी बेपत्ता होण्याच्या अनेक घटनांची नोंद पोलिसांनी केली आहे.

कोर्टातील केस मागे घेण्यासाठी घरात घुसून धमकी

बीबी: लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे एका महिलेच्या घरात बेकायदेशीरपणे घुसून एका आरोपीने जुनी कोर्टाची केस मागे घेण्यासाठी फिर्यादी व तिच्या कुटुंबाला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३, ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शेताचा रस्ता जेसीबीने खोदला, विचारणा केली म्हणून दगडफेक

जळगाव जामोद: पिंपळगाव काळे येथे एका शेतकऱ्याने इतरांचा सामायिक शेत रस्ता जेसीबीने खोदून अडवला. याबाबत शेतकऱ्यांनी विचारणा केली असता आरोपीने त्यांना शिवीगाळ करत, हातपाय तोडण्याची धमकी देऊन दगडफेक केली. याप्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

रस्त्यावरून चालण्याच्या कारणावरून लोखंडी फायटरने हल्ला

मलकापूर शहर: मलकापूर येथील मातकाम चौकात रस्त्यावरून चालण्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन आरोपींनी एका युवकाला अडवून वाद घातला. यातील एका आरोपीने लोखंडी फायटरने युवकाच्या गालावर गंभीर वार केले, तर इतर दोघांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत फिर्यादीचे पैसे आणि चांदीची साखळी गहाळ झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

घरात घुसून माय-लेकीचा विनयभंग

शिवाजीनगर: खामगाव येथील सतीफैल परिसरात एका नराधमाने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या घरात जबरदस्ती प्रवेश केला. त्याने महिलेच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला ओढत नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार केला असता आरोपीने तिच्यावरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत तिचा पदर ओढला. आरडाओरड झाल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत आरोपीच्या तावडीतून माय-लेकीची सुटका केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सोसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

वृद्धाची आत्महत्या

तामगाव: मनार्डी (ता. संग्रामपूर) येथील एका ६५ वर्षीय वृद्धाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

५८ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या

मलकापूर ग्रामीण: वडोदा शिवार येथील एका ५८ वर्षीय व्यक्तीने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी अकस्मात मृत्यूची (मर्ग) नोंद करून तपास सुरू केला आहे. कोणावरही संशय नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातून महिला व अल्पवयीन मुली बेपत्ता

खामगाव: (बोरी आडगाव) आणि मोताळा (कंडारी) परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींना (वय अनुक्रमे १७ वर्षे ७ महिने आणि एक अल्पवयीन मुलगी) अज्ञात किंवा संशयित आरोपींनी फूस लावून पळवून नेल्याची तक्रार पालकांनी दिली आहे. पोलिसांनी कलम १३७(२) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

जळगाव जामोद: (धानोरा महासिद्ध) येथून एक १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी, पिंळगाव राजा (हिवरा बु.) येथून कोर्टाचे काम असल्याचे सांगून गेलेली ३३ वर्षीय विवाहित महिला, आणि खामगाव (रावनटेकडी) येथून पहाटेच्या सुमारास एक १९ वर्षीय तरुणी कोणालाही काही न सांगता घरून निघून गेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!