बुलढाणा जिल्हा पोलीस डायरी: ३३ हजारांची वीज वायर चोरी, सुणगावात विनयभंग; जिल्ह्यातून वेगवेगळ्या घटनांत ४ तरुणी बेपत्ता!

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या घटना समोर आल्या आहेत. मलकापूर ग्रामीण हद्दीत मोठी चोरी, जळगाव जामोद येथे विनयभंगाची घटना घडली असून, शेगाव, सोनाळा, मलकापूर व जळगाव जामोद येथून एकूण ४ तरुणी बेपत्ता झाल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

शेतकऱ्याच्या शेतातील डीपीवरून ३३ हजारांची वायर लंपास

मलकापूर ग्रामीण: उमाळी शिवार येथील शेतकरी भरत पाटील यांच्या शेतातील ‘दवाखाना डीपी ६३ KVA’ या विद्युत रोहित्र वरून अज्ञात चोराने कटरच्या सहाय्याने ५,७६० मीटर लांबीची एल.टी. लाईनची ॲल्युमिनियम वायर (२४ गाले) कापून चोरून नेली. चोरीला गेलेल्या वायरची अंदाजे किंमत ३३,००० रुपये आहे. महावितरणचे सहाय्यक अभियंता श्रीनिवास चंद्रशेखर पुर्णेकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास ए.एस.आय. बाळू टाकरखेडे करत आहेत.

सुणगाव येथे घरात घुसून विनयभंग व जीवे मारण्याची धमकी

जळगाव जामोद: सुणगाव येथे फिर्यादी महिला (वय ३० वर्ष) यांच्या घरात आरोपींनी संगनमताने बेकायदेशीर प्रवेश केला. आरोपी अकबर खा तडवी याने महिलेचा विनयभंग केला, तर इतर आरोपी अय्युब तडवी, अफसर बलदार तडवी आणि जाकीर तडवी यांनी फिर्यादी व त्यांच्या जेठाणीला शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ठाणेदार सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

कॉलेजला गेलेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता

सोनाळा: ६ जुलै रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास बावनबीर बस स्टॉपवरून ‘खामगाव येथे कॉलेजला जाते’ असे सांगून गेलेली १९ वर्षीय तरुणी घरी परतलेली नाही. तिचा मोबाईलही बंद येत आहे. तिची उंची ५ फूट ४ इंच, रंग गोरा, केस लांब, अंगात काळ्या रंगाची लेंगी व कथिया रंगाचा टॉप (पंजाबी ड्रेस), पायात काळ्या सँडल घातलेली आहे. याप्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार संजय पवार हे करीत आहेत.

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे पाहण्यासाठी गेलेली तरुणी बेपत्ता

शेगाव शहर: शहरातील पंचशील नगर परिसरात राहणारी १९ वर्षीय तरुणी ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता ‘आईचे लाडक्या बहिणीचे पैसे आले का’ हे पोस्ट ऑफिसमध्ये बघायला जाते असे सांगून घरातून निघून गेली. ती परत घरी परतलीच नाही. तिचा रंग निमगोरा, उंची ५ फूट ४ इंच, जाड बांधा, गोल चेहरा, काळे लांब केस, जांभळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस. तिच्याकडे ओप्पो कंपनीचा मोबाईल आहे. याप्रकरणी मिसिंग दाखल केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील सुसर हे करीत आहेत.

१८ वर्षीय प्रतीक्षा जाधव घरून बेपत्ता

मलकापूर शहर: येथील चैतन्यवाडी परिसरात राहणारी १८ वर्ष ३ महिने वयाची तरुणी ७ जुलै रोजी दुपारी २ वाजता घरी काहीही न सांगता निघून गेली. नातेवाईक व मैत्रिणींकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. तिचा रंग गोरा, काळे केस, उंची ४ फूट ८ इंच, अंगात गुलाबी रंगाचा टॉप, गुलाबी प्लाझो व चॉकलेटी रंगाचा स्कार्फ घातलेला आहे. याप्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल शेले हे करीत आहेत.

बुरखा परिधान केलेली आयशा खान बेपत्ता

जळगाव जामोद: पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खेर्डा वेस येथे राहणारी १८ वर्षीय तरुणी ७ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजता राहत्या घरातून निघून गेली. ती अद्याप घरी परतलेली नाही. तिचा रंग गोरा, उंची ५ फूट १ इंच, लांब केस, हातावर मेहंदी, अंगात काळ्या रंगाचा बुरखा आणि पायात राखाडी (ग्रे) रंगाची जुती घातलेली आहे. याप्रकरणी मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार संजय वेरूळकर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!