अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात एकीकडे सायबर गुन्हेगारांनी नागरिकांना जाळ्यात ओढून लाखोंचा गंडा घातल्याच्या घटना समोर आल्या आहेत, तर दुसरीकडे जिल्हाभरात वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सायबर पोलीस ठाण्यासह रायपूर, मलकापूर आणि धाड पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे व मर्ग नोंदवण्यात आले आहेत.
जानेफळ: (ता. मेहकर) येथील शेतकरी शेख ईस्माईल शेख मुगल (वय ५८ वर्षे) यांना अज्ञात भामट्यांनी ‘पोलीस अधिकारी’ असल्याचे भासवले. मुलाला व त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल महिनाभर (२८ जून ते २७ जुलै) मानसिक दबावात ठेवले. भीतीपोटी तक्रारदाराने RTGS द्वारे ५ लाख रुपये पाठवले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २०४, २०५, ३१८(२), ३१८(४), ३१९(२) सह ६६(c), ६६(d) IT ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहकर: शिक्षक कॉलनी, मेहकर येथील सेवानिवृत्त तलाठी तान्हाजी दगडू बाठोरे (वय ५८ वर्षे) यांचा मोबाईल अज्ञात आरोपीने हॅक केला. त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून गुगल पे आणि फोन पे द्वारे परस्पर ४ लाख ६२ हजार रुपये विविध बँक खात्यांवर वळवून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष रोही करत आहेत.
रायपूर: येथील नितीन रतन हनवते (वय २७ वर्षे) हा १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी अतिमद्यप्राशन केलेल्या अवस्थेत घरातून निघून गेला होता. तो परत न आल्याने शोध घेतला असता, १९ ऑगस्ट रोजी सकाळी घरासमीप असलेल्या विहिरीत त्याचा मृतदेह गळाला लागलेल्या अवस्थेत आढळला. रायपूर पोलीस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आली असून तपास अनिल घाटे करत आहेत.
मलकापूर: धोनखेड (ता. मोताळा) येथील रहिवासी कमलाकर कडू सोनोने (वय ६५ वर्षे) यांनी अज्ञात कारणावरून विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना उपचारासाठी निरामय रुग्णालय, मलकापूर येथे आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रुग्णालयाच्या मेमोवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात कायम मर्ग दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळ धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील तपासासाठी मर्ग वर्ग करण्यात आला आहे.
धाड: मासरूळ (ता. जि. बुलढाणा) येथील विनोद गोपीनाथ कारंजकर (वय ४६ वर्षे) यांनी १८ ऑगस्ट रोजी दुपारी घरचे लोक बाहेर गेलेले असताना राहत्या घरी लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊ राजू कारंजकर यांच्या तोंडी रिपोर्टवरून धाड पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून प्राथमिक तपास पोलीस अंमलदार समाधान देशमाने करत आहेत.
