अजय टप
बुलढाणा, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो) : बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या अनेक खळबळजनक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पतीसह सासरच्यांवर हुंडा छळाचा गुन्हा दाखल झाला असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तसेच जुन्या वादातून एका तरुणाचे फिल्मी स्टाईलने दुचाकीवरून अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणांमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
लग्नात हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ; मुंबई पोलीस दलातील पतीसह सासरच्यांवर गुन्हा
चिखली: तालुक्यातील दहीगाव येथील असून सध्या पीडित विवाहिता सौ. मिना उर्फ पल्लवी विजय लहाणे (वय ३०) या बुलढाणा शहरातील चिचोले नर्सिंग कॉलेजजवळ राहत आहेत. २०१२ मध्ये त्यांचा विवाह मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विजय भिकाजी लहाणे यांच्याशी झाला होता.
लग्नानंतर “लग्नात हुंडा दिला नाही, तुला घरातील काम येत नाही आणि तू दिसायला चांगली नाहीस” असे टोमणे मारत पती व सासरच्या नातेवाईकांनी त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. महिला समेट कक्षातही यावर तोडगा निघू शकला नाही. अखेर विवाहितेच्या जबाबावरून बुलढाणा शहर पोलिसात पती विजय लहाणे व इतर नातेवाईकांविरुद्ध कलम ८५, ३५२, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार गजानन दांडगे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नाशिकच्या सासरच्या ७ जणांविरुद्ध छळाचा गुन्हा
बुलढाणा: दुसऱ्या एका घटनेत, मूळची नाशिक येथील रहिवासी असलेली आणि सध्या बुलढाणा पोलीस वसाहतीत राहणारी विवाहिता सौ. अश्विनी नितीन उबाळे (वय २७) हिने पती नितीन रामकिसन उबाळे, सासू मिरा उबाळे, सासरे रामकिसन उबाळे यांच्यासह ७ जणांविरुद्ध छळाची तक्रार दिली आहे.
लग्नात वडिलांनी चारचाकी गाडी आणि इतर वस्तू दिल्या असतानाही, सासरच्यांनी वर्षभरानंतर तिला टोमणे मारणे व उपाशी ठेवणे सुरू केले. पती नेहमी संशय घेऊन माहेरून एक लाख रुपयांची मागणी करत होता. या छळाला कंटाळून अखेर तिने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून बीट हवालदार प्रकाश बाजड पुढील तपास करत आहेत.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे अपहरण
बुलढाणा: शहरातील चिंचोले चौक परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची चिंताजनक घटना घडली आहे. अपहरण झालेली १७ वर्षीय मुलगी ११ वी मध्ये शिकत असून ती ध्येय अकॅडमी येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. १२ जुलै २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता ती ‘क्रॉप पेपर’ आणण्यासाठी जनरल स्टोअर्सवर जाते असे सांगून घराबाहेर पडली, ती अद्याप घरी परतलेली नाही. नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. कोण्या अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी कलम १३७(२) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एएसआय नामदेव खवले मुलीचा शोध घेत आहेत.
तरुणाचे दुचाकीवरून अपहरण करून बेदम मारहाण; चालत्या गाडीवरून उडी मारून वाचवला जीव
बुलढाणा: जयस्तंभ चौकातील एकलव्य पुतळ्याच्या पाठीमागील पानटपरी समोरून एका २० वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. सय्यद मतीन सय्यद मोसीन (वय २०, रा. इक्बाल नगर, बुलढाणा) हा हमालीचे काम करतो. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी प्रतीक बोर्डे, गणेश गवई आणि अमित बेंडवाल यांनी त्याचा रस्ता अडवला. “तू काल वाचलास, आज वाचणार नाहीस” असे म्हणत त्याला कंबरपट्टा आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून संगम तलावाकडे नेण्यात आले आणि तिथेही बेदम मारहाण करण्यात आली. तेथून त्याला दुसऱ्या ठिकाणी नेत असताना, मतीनने अत्यंत धाडसाने एसपी ऑफिस जवळ चालत्या दुचाकीवरून उडी मारली आणि पळ काढत स्वतःचा जीव वाचवला. एएसआय नामदेव खवले या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ट्विस्ट: मारहाण झालेल्या फिर्यादी तरुणालाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
या घटनेत एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. अपहरण आणि मारहाणीचा बळी ठरलेला सय्यद मतीन सय्यद मोसीन हा स्वतः शहर पोलिसात दाखल असलेल्या एका जुन्या गुन्ह्यात (अपराध क्र. ६२८/२०२६) आरोपी होता. मारहाणीत जखमी झाल्यामुळे त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. १३ जुलै रोजी रात्री त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच आणि डॉक्टरांनी त्याला ‘फिट’ घोषित करताच, पीएसआय रवी मोरे यांनी त्याला तात्काळ अटक केली. त्याला सध्या पोलीस कोठडीत (हवालात) बंद करण्यात आले आहे.
विष प्राशन केलेल्या ६२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू
बुलढाणा: माळविहीर येथील रहिवासी दिनकर सखाराम वैद्य (वय ६२) या वृद्धाने ६ जुलै २०२६ रोजी राहत्या घरी उंदीर मारण्याचे औषध आणि अल्कोहोल प्राशन केले होते. त्यांना तात्काळ अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. अकोला शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी मर्ग दाखल केला असून हवालदार सुभाष म्हस्के अधिक तपास करत आहेत.
