बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): लग्नात हुंडा दिला नाही म्हणून एका ३० वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पतीसह त्याच्या पाठीशी घालणाऱ्या नातेवाईकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीना उर्फ पल्लवी विजय लहाणे (वय ३० वर्षे) सध्या रा. गुरुकृपा नगर, चिचोले नर्सिंग कॉलेजजवळ, बुलढाणा यांचा विवाह २०१२ मध्ये ग्राम दहीगाव (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथील रहिवासी विजय भिकाजी लहाणे यांच्यासोबत झाला होता. आरोपी पती विजय लहाणे हे सध्या मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. लग्नानंतर “लग्नात हुंडा दिला नाही,” या कारणावरून पती विजय आणि त्याच्या कुटुंबातील इतर नातेवाईकांनी पल्लवी यांना त्रास देण्यास सुरुवात केली. “तुला घरातील काम येत नाही, तू दिसायला बरोबर नाहीस,” असे टोमणे मारत त्यांचा छळ केला जात होता. तसेच त्यांना वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देऊन, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार विवाहितेने केली आहे. या जाचाला कंटाळून पीडितेने बुलढाणा येथील ‘महिला समेट कक्ष’ येथे दाद मागितली होती. मात्र, समेट कक्षात दोन्ही बाजूंमध्ये समेट घडून येऊ शकली नाही. समेट अपयशी ठरल्याने अखेर पीडितेने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती व नातेवाईकांविरुद्ध रीतसर जबाब नोंदवला.
पीडितेच्या जबाबावरून बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी पती विजय भिकाजी लहाणे व इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ८५, ३५२, ३५१(३), आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार गजानन दांडगे हे करत आहेत.
