बुलढाणा जिल्हा पोलीस डायरी: चिखली-जामोद येथून दोन तरुणी बेपत्ता; मलकापूर आणि धाड पोलिसांची गुन्हेगारांवर धडक कारवाई

अजय टप

बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी पोलीस दलाने विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत धडक कारवाया सुरू केल्या आहेत. कौटुंबिक भांडणे, अवैध व्यवसाय, आणि मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून दोन बेपत्ता तरुणींचा शोध देखील घेतला जात आहे.

बैलाच्या ‘घागर माळे’वरून वाद; लहान भावाचे डोके फोडले

धाड : पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या अटकळ (ता.जि.बुलढाणा) येथे नातेवाईकांमध्ये बैलाच्या ‘घागर माळा’ कोणाकडे असाव्यात या कौटुंबिक वादावरून मोठी हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी यांच्या घरी आरोपींनी येऊन ‘घागर माळा’ मागितल्या. त्यावर फिर्यादीने “या माळांवर तीनही भावांचा अधिकार आहे, त्यामुळे केवळ तुला एकट्याला कशा द्यायच्या?” असे विचारले. यावरून संतापलेल्या आरोपींनी फिर्यादीच्या लहान भावाला आणि त्याच्या पत्नीला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच एका आरोपीने रागाच्या भरात डोक्यात दगड मारून फिर्यादीच्या लहान भावाचे डोके फोडले व जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी धाड पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस अंमलदार समाधान देशमाने करत आहेत.

अवैध तंबाखू विक्री, जुगार आणि मद्यपींवर कडक कारवाई

मलकापूर शहर : मलकापूर पोलिसांनी शहरात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अवैध कृत्यांवर चाप लावला आहे. पोलिसांनी जिल्हा परिषद शाळेसमोर धाड टाकून एका ६० वर्षीय इसमाला शाळेच्या प्रतिबंधित परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना रंगेहात पकडले. आरोपीच्या ताब्यातून गुलाब तंबाखू, गायछाप तंबाखू आणि उंट बिडी, असा एकूण ३२५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू आहे.

तहसील चौकात मटका जुगारावर छापा

तहसील चौकातील लकीराज मेडिकलजवळ सार्वजनिक ठिकाणी वरळी मटका जुगार चालवणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. झडतीदरम्यान ३१० रुपये रोख आणि जुगाराशी संबंधित साहित्य जप्त करण्यात आले असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दारूच्या नशेत दुचाकी चालवणाऱ्यावर गुन्हा

हनुमान चौक परिसरात पोलिसांनी संशयास्पद दुचाकी क्रमांक एमएच-२८-एव्ही-५५६७ च्या चालकाला अडवले. वैद्यकीय तपासणीत तो दारूच्या नशेत असल्याचे डॉक्टरांनी प्रमाणित केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

चिखली आणि जळगाव जामोद: दोन तरुणी बेपत्ता

चिखली हॉस्टेलमधून तरुणी बेपत्ता

चिखली येथील एका हॉस्टेलमध्ये राहणारी २२ वर्षीय तरुणी कॉलेजला सुट्टी असल्यामुळे शनिवार-रविवार घरी जाण्यासाठी निघाली होती. मात्र, ती घरी न पोहोचल्याने पालकांनी हॉस्टेल आणि परिसरात शोध घेतला. ती हॉस्टेलमधून आधीच निघून गेल्याचे समजले असून तिचा मोबाईल फोन देखील बंद येत आहे. या प्रकरणी चिखली पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

जळगाव जामोद परिसरातून तरुणी बेपत्ता

जामोद येथील २१ वर्षीय तरुणी घरामध्ये कोणालाही काहीही न सांगता अचानक निघून गेली आहे. नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेऊनही ती मिळून आलेली नाही. सदर तरुणी साधारण ५ फूट ५ इंच उंचीची, गोऱ्या रंगाची असून तिच्या उजव्या हातावर पाच ठिपक्यांचे गोंदण आहे. घराबाहेर पडताना तिने रेषेदार डिझाईनचा टॉप परिधान केला होता. जळगाव जामोद पोलिसांनी मिसिंग दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार शेख इरफान करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!