मलकापुरात खळबळ! चोरांनी थेट निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाचेच घर फोडले; ४ लाख २४ हजारांचा ऐवज लंपास!

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): शहरात चोरांचे धाडस इतके वाढले आहे की, आता खुद्द कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची घरेही सुरक्षित राहिलेली नाहीत! मलकापूर शहरातील नंदनवन नगर परिसरात एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या बंद घराला लक्ष्य करत अज्ञात चोरट्यांनी तब्बल ४ लाख २४ हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारला आहे. या धाडसी चोरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून, चोरांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुभाष प्रल्हाद पहुरकर (वय ६० वर्षे) रा. अग्रवाल टेन्ट हाऊसजवळ, नंदनवन नगर, मलकापूर हे ११ जुलै रोजी दुपारी १२ ते रात्री ८ वाजेदरम्यान आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत दबा धरून बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. रात्री जेव्हा पहुरकर कुटुंबीय घरी परतले, तेव्हा मुख्य दरवाजावरील कडीकोंडा जागेवर होता, मात्र कुलूप गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरात जाऊन पाहणी केली असता कपाटाचे कुलूप तोडून आतील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास झाल्याचे समोर आले. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याच्या दोन बांगड्या (वजन अंदाजे ४ तोळे, किंमत १ लाख २० हजार रुपये), सोन्याची सौभाग्यवती पोत (वजन अंदाजे ४ तोळे, किंमत १ लाख २० हजार रुपये), सोन्याची चैनसारखी पोत (वजन अंदाजे ३ तोळे, किंमत ९० हजार रुपये), लहान सोन्याची पोत (वजन अंदाजे १ तोळा, किंमत ३० हजार रुपये), सोन्याची गोल रिंगची अंगठी (वजन अंदाजे ४ ग्रॅम, किंमत १२ हजार रुपये), चांदीच्या दोन जोड चैनपट्ट्या (वजन अंदाजे ६ तोळे, किंमत १२ हजार रुपये), नगदी रोकड ४० हजार रुपये, असा एकूण ४ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

या घटनेनंतर सुभाष पहुरकर यांनी तातडीने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!