अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): मलकापूर तालुक्यात अवैध जनावरांच्या वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात काही कथित जनावर वाहतूक करणारे, कत्तलखान्याशी संबंधित व्यक्ती आणि काही पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत बंद दाराआड बैठक झाल्याची चर्चा तालुक्यात रंगत आहे. या कथित बैठकीनंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ मार्गे शेळ्या, मेंढ्या, म्हशी, बैल व गायींची अवैधरित्या वाहतूक जोमाने सुरू झाल्याची चर्चा असून यामध्ये वाढच होणार असल्याचे बोलल्या जात आहे. आम्ही मिळालेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारावर ही अवैध जनावरांची वाहतुकीबाबत वृत्त देत असलोतरी या दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
सुरू असलेल्या चर्चेनुसार संबंधित बैठकीत अवैध जनावरांच्या वाहतुकीबाबत काही कथित समन्वय साधण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, या बैठकीनंतर काही वाहनांची वर्दळ वाढल्याची चर्चा होत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व बाबींची स्वतंत्रपणे अधिकृत पडताळणी झालेली नाही. तालुक्यात यापूर्वीही अवैध जनावरांच्या वाहतुकीबाबत अनेकदा तक्रारी झाल्या आहेत. काही वेळा पोलिसांनी कारवायाही केल्या आहेत; मात्र अशा प्रकारच्या चर्चांमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून जनावरांच्या वाहतुकीबाबत कोणी बैठक घेतली? कोण यामागचा सुत्रधार आहे? आणि बैठकीत कोण कोण होते? असे अनेक प्रश्न आता समोर येवू लागले आहेत. जर अशा प्रकारची कोणतीही बैठक झाली नसेल, तर संबंधित विभागाने त्याबाबत अधिकृत खुलासा करावा. आणि जर आरोपांमध्ये तथ्य आढळले, तर संबंधितांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यामुळे अफवांना पूर्णविराम मिळेल आणि जनतेचा कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकार्यांनी दखल घेऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्यात कथितरित्या झालेल्या या बैठकीचे वास्तव काय आहे, तसेच अवैध जनावरांच्या वाहतुकीमागे कोणतेही साखळी स्वरूपाचे रॅकेट कार्यरत आहे का? याचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. सध्या या चर्चांमुळे मलकापूर तालुक्यातील वातावरण तापले असून, संबंधित यंत्रणा यावर काय भूमिका घेते आणि या प्रकरणातील सत्य काय आहे, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
