क्राईम जगत

चिमुरडींना मृत्यूच्या दारात ढकुलन मातेने जीवन संपवले

लोणार तालुक्यातील वढव येथील घटना

लोणार,(प्रतिनिधी) :

‘अरे संसार संसार’ या कवितेतून बहिनाबाई चौधरी यांनी संसाराचे हुबेहुब वर्णण केलेले आहे. संसार म्हटला की कुरबुरी येतातच. पण, या वादाचा शेवट इतका भयंकर असू शकतो, याचा साधा विचारही वढव (ता.लोणार) येथील ग्रामस्थांना स्वप्नातही आला नसेल. पतीसोबत झालेल्या वादातून संतापलेल्या एका २२ वर्षीय मातेने स्वत:ची जिवनयात्रा तर संपवलीच, सोबतच आपल्या पोटच्या दोन चिमुरड्यांना आयुष्यभर पुसता न येणारी जखम दिली. दगडालाही पाझर फोडणारी ही घटना २४ डिसेंबरच्या दुपारी १२ वाजता दरम्यान घडली.

वढव (ता.लोणार) येथील कांचन अमोल सोनुने (वय २२ वर्षे) आणि पती अमोल सोनुने यांच्यात घरगुती कारणांवरुन वाद झाला. या वादाचा राग अनावर झालेल्या कांचनने २४ डिसेंबरच्या दुपारी आपल्या अवघ्या ३ वर्षांच्या आकांक्षा आणि ६ महिन्यांच्या प्रांजल नावाच्या काळजाच्या तुकड्यांना स्वत:च्या हाताने मृत्यूच्या फासावर लटकवले. मुलींना फासावर लटकवल्यानंतर कांचनने स्वत:ही गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेमुळे अवघ्या काही क्षणात एका हसत्याखेळत्या संसाराची राखरांगोळी झाली. घडलेल्या या घटनेमुळे ग्रामीण भागातील कौटुंबिक कलहातून मानसिक आरोग्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. एक आई आपल्या पोटच्या गोळ्यांना मृत्यूच्या दारात कशी काय नेऊ शकते?, या विचाराने तालुक्यातील समाजमन सुन्न झाले आहे. या प्रकरणी लोणार पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.
अन् चिमुरड्या वाचल्या
नियतीलाही कदाचित निष्पाप जिवांचा बळी नको होता. म्हणूनच फासावर लटकवल्यानंतर फासाची निसटली आणि दोन्ही मुली खाली पडल्या. चिमुरड्यांचा टाहो कानावर पडल्याने गावकऱ्यांनी कांचनच्या घराकडे धाव घेतली. दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर समोरील दृश्य बघुन गावकऱ्यांचे काळीजच फाटले.
राग आणि वियोग

कांचनने ज्या वयात जिवनयात्रा संपवली ते वय म्हणजे जिद्द आणि स्वप्न बघण्याचे होते. मात्र, घरगुती वादातून आलेल्या नैराश्यामुळे एका कुटुंबाचा आधार हिरावला. आज आकांक्षा आणि प्रांजल सुरक्षित असल्या तरी, आई कुठे गेली?, या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नियतीही देऊ शकणार नाही, एवढे मात्र खरे!

सुभाष मोहिते

संपादक हिंदवार्ता बुलढाणा (महाराष्ट्र) Email: hindvarta4@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!