अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): मलकापूर तालुक्यातील हिंगणाकाझी येथील २२ वर्षीय तरुण कामावर जातो असे सांगून घरातून निघून गेला, परंतु तो अद्याप घरी न परतल्याने परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात ‘मिसींग’ दाखल करण्यात आली आहे.
हिंगणाकाझी येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार रेहाना बी शेख समीर पिंजारी (वय ३९ वर्षे) यांचा मुलगा रमजान शेख समीर पिंजारी (वय २२ वर्षे) हा २ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास घरातून निघाला होता. “मी मलकापूर येथे कामाला जातो,” असे त्याने आपल्या आईला सांगितले होते. मात्र, रात्र होऊनही तो घरी परतला नाही. कुटुंबियांनी सुरुवातीला तो कामाच्या ठिकाणी थांबला असावा असा अंदाज वर्तवला, परंतु बराच वेळ झाल्यानंतर त्यांनी गावात आणि सर्व नातेवाईकांकडे त्याची चौकशी केली. सर्वत्र शोध घेऊनही रमजानचा कोणताही पत्ता लागला नाही.
या प्रकरणी रेहाना बी शेख समीर पिंजारी यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसग दाखल केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड हे करीत आहेत.