खामगाव,(प्रतिनिधी):हॉटेल मालक घरी अंघोळीला गेल्याची संधी साधून हॉटेलमधील लॅपटॉप, टॅब आणि कार घेऊन पसार झालेल्या नोकराला शिवाजी नगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दालफैल, खामगाव येथील रहिवासी श्रीकांत प्रदीपराव देशमुख (वय ३२ वर्षे) यांचे स्वतःचे हॉटेल आणि लॉजिंग आहे. या हॉटेलवर त्यांनी सुनील विश्वनाथ नेमाणे (वय ३० वर्षे), रा. अमडापूर नाका, सजनपुरी याला कामावर ठेवले होते. १ एप्रिल २०२६ रोजी हॉटेल मालक श्रीकांत देशमुख हे हॉटेलवरून घरी अंघोळीसाठी गेले असता, हीच संधी साधून आरोपी सुनील नेमाणे याने हॉटेलच्या काउंटरवरून मोटोरोला कंपनीचा टॅब (किंमत २० हजार रुपये), एचपी कंपनीचा लॅपटॉप (किंमत ३५ हजार रुपये), रेनॉल्ड क्विड कार एमएच-१२–टीडी-५२९५ (किंमत २ लाख ५० हजार रुपये), असे एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा माल घेऊन आरोपी फरार झाला होता. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच ठाणेदार अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनि पुरी, पोलीस अंमलदार संदीप टाकसाळ, केशव झाल्टे, पल्लवी बोर्डे, विशाल सोनवणे, आणि सायबर विभागाचे राजू आडवे व कैलास यांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांमार्फत शोध सुरू केला. जुना टोल नाका परिसरात एक मोरपंखी रंगाची कार संशयास्पदरीत्या उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारची पाहणी केली असता, त्यात बसलेला इसम हॉटेलमधील नोकर सुनील नेमाणे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
