अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): टीव्ही पाहण्याच्या किरकोळ कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना मलकापूर शहरातील संत ज्ञानेश्वरनगर भागात घडली आहे. या मारहाणीत वडिलांचा एक दात पडला असून चार दात गंभीररीत्या हालू लागले आहेत. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी मुलावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील संत ज्ञानेश्वरनगरमध्ये राहणारे प्रफुल काशीनाथ निकम (वय ४६ वर्षे) हे रात्रीच्या सुमारास आपल्या घरात टीव्ही पाहत होते. यावेळी त्यांचा मुलगा तुषार प्रफुल निकम (वय २४ वर्षे) याने “टीव्हीचा आवाज इतका मोठा का लावला?”, असे विचारत वडिलांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वडिलांनी “मला टीव्ही पाहू दे, विनाकारण वाद करू नको”, असे शांतपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागाच्या भरात असलेल्या तुषारने वडिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करुन “तुला जीवाने मारून टाकीन” अशी धमकी दिली. क्षणात वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. प्रफुल निकम यांनी मुलाला “जोरात का बोलतोस?”, असे विचारले असता, तुषारने आपल्या वडिलांच्या तोंडावर उजव्या हाताने आणि पायाने जोरदार वार केले. त्यामुळे प्रफुल निकम यांच्या खालच्या जबड्याचा एक दात जागीच पडला, तर आजूबाजूचे चार दात खिळखिळे झाले आहेत. इतक्यावरच न थांबता आरोपीने वडिलांना दोन्ही हातांनी आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले.
याप्रकरणी प्रफुल निकम यांनी मलकापूर शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी तुषार निकम याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ११७ (२), ३५२, ३५१ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार अमोल शेले हे करीत आहेत.. या घटनेमुळे परिसरात कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, किरकोळ वादातून मुलाने वडिलांवर केलेल्या या हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.