जळगाव जामोद हादरले! मध्यरात्री ‘टार्गेट’ द्वारकानगर; सलग दोन घरे फोडून चोरट्यांचा धुमाकूळ; जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गुन्हेगारांचे तांडव; पोलिसांच्या गस्तीला चोरट्यांचे खुले आव्हान!

अजय टप

जळगाव जामोद,(प्रतिनिधी): जळगाव जामोद शहरात सध्या भीतीचे सावट पसरले असून, अज्ञात चोरट्यांनी सलग दोन घरे फोडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. द्वारकानगर आणि पाटील नगर परिसरात १६ एप्रिलच्या मध्यरात्री झालेल्या या धाडसी घरफोडीत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ६५,५०० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, “आता सामान्य माणसाने सुरक्षित राहायचे कुठे?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

जळगाव जामोद शहरातील द्वारकानगर येथील रहिवासी आणि पेशाने शिक्षक असलेले सुनील प्रभाकर हागे हे १६ एप्रिलच्या रात्री काही कामानिमित्त बाहेर असताना, अज्ञात चोरट्यांनी संधी साधली. १६ एप्रिलच्या रात्री ८ वाजेपासून ते १७ एप्रिलच्या पहाटे ५.३० वाजेपर्यंतच्या दरम्यान हा ‘खेळ’ रंगला. चोरट्यांनी हागे यांच्या घराचे कुलूप अत्यंत शिताफीने तोडून घरात प्रवेश केला.

घरातील कपाटाचे कुलूप तोडताना चोरट्यांच्या हाती काय लागेल याची त्यांनी आधीच खातरजमा केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. कपाटातून नवाबी सोन्याची चैन (१० ग्रॅम) – किंमत ३५ हजार रुपये, सोन्याचे टापसे (५ ग्रॅम) – किंमत १७ हजार रुपये, चांदीचा शिक्का आणि नगदी ७ हजार रुपयांवर हात मारला. एवढ्यावरच या चोरट्यांचे मन भरले नाही. त्यांनी आपला मोर्चा लगतच्या पाटील नगर येथील भूषण महाले यांच्या घराकडे वळवला. तिथेही कुलूप तोडून कपाटातील लहान मुलीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या चोरून नेल्या. एकाच रात्री दोन ठिकाणी झालेली ही चोरी म्हणजे गुन्हेगारांची वाढलेली हिंमत दर्शवत आहे.

घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. सकाळी ८ ते १० च्या दरम्यान त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार संजय वेरुळकार हे करीत आहेत. शिक्षक सुनील हागे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. मात्र, जळगाव जामोद शहरात निर्माण झालेली ही घबराट दूर करण्यासाठी केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर चोरट्यांना बेड्या ठोकून मुद्देमाल हस्तगत करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात धुमाकूळ घालणारे हे ‘अज्ञात’ हात पोलिसांच्या हाती कधी लागणार? की पुन्हा एकदा नवीन ‘टार्गेट’ शोधण्यासाठी चोरटे मोकळे राहणार?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नांदुऱ्यातही घरफोडी!

नांदुरा शहरातील पयोष्णी नगर भागातील निवृत्त शेतकरी दिनेशसिंह हिंमतसिंह राजपुत (वय ६३ वर्षे) यांच्या घरात घुसून अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. चोरट्यांनी घराचे कुलूप आणि कपाटाचे लॉकर तोडून ७० हजार रुपये रोख, ३.५ तोळे वजनाची जुनी वापरती सोन्याची गहुमणी पोत (किंमत अंदाजे ७० हजार रुपये), पॅनकार्ड, आधारकार्ड, नांदुरा अर्बन बँकेचे पासबुक आणि चेकबुक चोरून नेले. याप्रकरणी नांदुरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार मिलिंद जवंजाळ हे करीत आहेत.

जिल्ह्याचा कानाकोपरा असुरक्षित का?

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कधी महामार्ग, तर कधी गजबजलेली वस्ती; चोरट्यांसाठी जणू काहीच कठीण राहिलेले नाही. एकीकडे पोलिसांकडून पोलीस गस्त वाढवल्याचे दावे केले जातात, मात्र मध्यरात्री शिक्षक आणि सामान्य नागरिकांची घरे फुटतातच कशी?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!