मेहकर,(प्रतिनिधी):एखाद्या अंगावर शहारे आणणाऱ्या हिंदी सस्पेन्स सिनेमालाही लाजवेल असा भयानक जिवंत थरार मेहकर तालुक्यात उघडकीस आला आहे. ज्या मित्रावर विश्वास ठेवला, त्यानेच काळजाचा घोट घेतला आणि खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट चक्क एका चालू हॉटेलच्या काउंटरखाली लावली. तब्बल तीन वर्षांनंतर जमिनीने आपलं तोंड उघडलं आणि एका भीषण हत्याकांडाचा पर्दाफाश झाला.
सुकळी येथील ३४ वर्षीय युवक विनोद अश्रुबा नवले हा तीन वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पोलिसांनी शोध घेतला, पण विनोदचा पत्ता लागला नाही. तो कुठे गेला? की त्याला कुणी गायब केलं? हे गूढ कायम होतं. मात्र, नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं. तीन वर्षांपासून जमिनीखाली गाडलेलं हे पाप अखेर बाहेर आलंच.
जसं ‘दृश्यम’ चित्रपटात विजय साळगावकर आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी एका पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा मृतदेह चक्क पोलीस स्टेशनच्या खाली गाडतो… अगदी तसाच, पण त्याहूनही क्रूर आणि वास्तव थरार मेहकर तालुक्यातील सुकळी आणि जामगाव शिवारात घडला. चित्रपटात विजय साळगावकर म्हणतो, “चौथी फेल डोकं काय काय करू शकतं, याची तुम्हाला कल्पना नाही.” पण मेहकरच्या या घटनेत एका गुन्हेगारी डोक्याने चित्रपटातील कल्पनेलाही मागे टाकलं आहे.
मेहकरमध्ये घडलेल्या दृश्यम ३ च्या कथानकात साळगावकरच्या भूमिकेत ‘सुनील जाधव’ (मास्टरमाईंड)
सुनील जाधव आणि विनोद नवले (मृतक) हे अगदी विजय साळगावकरच्या चित्रपटातील पात्रांसारखे मित्र. पण सुनीलच्या मनात मैत्री नाही, तर खुनाचा कट शिजत होता. त्याने आपल्या कर्जाचा वापर करून एका हॉटेल मालकाला, सचिन उगलेला, गुन्ह्यात सामील करून घेतलं. चित्रपटात पोलीस स्टेशनच्या बांधकामाखाली मृतदेह गाडला जातो, पण इथे ‘जामगाव शिवारातील बाबूभाईंचं शेत आणि तिथे असलेला सचिनचा ढाबा’ हे मुख्य केंद्र बनलं. तीन वर्षांपूर्वी एका रात्री विनोदची हत्या झाली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी अशी जागा निवडली जिथे कुणाचं लक्ष जाणार नाही, ते म्हणजे हॉटेलचं कॅश काउंटर!
३ वर्षांनी जमिनीने ‘सत्य’ ओकलं!
चित्रपटात पोलीस वर्षानुवर्षे तो मृतदेह शोधत असतात. मेहकर पोलिसांनीही तीन वर्षे विनोदचा शोध घेतला, पण तो ‘बेपत्ता’च राहिला. मात्र, जसं चित्रपटात एक छोटीशी चूक किंवा माहिती अख्खं प्रकरण उघड करते, तसंच काल पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली. २१ एप्रिलची ती सकाळ आणि पोलीस ताफा, जेसीबी आणि फॉरेन्सिक टीम जामगावला पोहोचली. हॉटेलच्या ज्या काउंटरवर बसून तीन वर्षे पैशांचे व्यवहार झाले, जिथे शेकडो लोकांनी जेवण केलं, त्याच जमिनीखाली जेसीबीचा पंजा शिरला आणि…विनोद नवलेच्या मृतदेहाचे अवशेष बाहेर आले!
‘दृश्यम’ चित्रपटात आपण पडद्यावर जे पाहिलं आणि टाळ्या वाजवल्या, तेच आज मेहकरच्या मातीत रक्ताने लिहिलं गेलं. फरक फक्त इतकाच की, चित्रपट संपतो, पण विनोद नवलेच्या कुटुंबासाठी हे दुःख कधीही न संपणारं आहे. “सत्य कितीही खोल पुरलं, तरी ते कधी ना कधी बाहेर येतंच”, ही ‘दृश्यम’ची टॅगलाईन आज मेहकर पोलिसांनी सत्यात उतरवून दाखवली आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या जाळ्यात असून, या ‘रिअल लाईफ दृश्यम’ प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात आहे.
म्हणून रचला कट
जामगाव शिवारातील बाबूभाई कुरेशी यांच्या शेतात सचिन उगले नावाच्या तरुणाने हॉटेल (ढाबा) सुरू केले होते. सचिनने सुनील जाधव कडून काही रक्कम उसने घेतली होती. सुनील जाधव सातत्याने पैशांची मागणी करत होता. जेव्हा सचिन पैसे देऊ शकला नाही, तेव्हा सुनीलने एक भयानक अट घातली, “मला एकाचा काटा काढायचा आहे, तू मला मदत कर, मग तुला पैसे परत करण्याची गरज नाही!”
ती काळरात्र… आणि हॉटेलचं काउंटर!
तीन वर्षांपूर्वी एका रात्री, सुनील जाधव विनोद नवले याला घेऊन सचिन उगलेच्या हॉटेलवर पोहोचला. तिथे भरपूर मद्यप्राशन करण्यात आले. विनोदला कल्पनाही नव्हती की ज्या मित्रासोबत तो मद्य पितोय, तोच त्याचा काळ ठरणार आहे. नशेत असतानाच विनोदची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं आव्हान होतं. मग शिजला तो क्रूर प्लॅन. हॉटेलच्या काउंटरखालील जमीन खणून विनोदचा मृतदेह तिथेच पुरण्यात आला! विशेष म्हणजे, त्याच जमिनीवर, त्याच काउंटरवर बसून पुढील तीन वर्षे हॉटेलचे व्यवहार सुरू राहिले, गिऱ्हाईकं येत गेली, पण कोणालाही जमिनीखालील त्या मृतदेहाचा सुगावा लागला नाही.