अजय टप
शेगाव (प्रतिनिधी): शेगाव शहरातील वाटिका चौक परिसरात असलेल्या ‘अपना फर्निचर’ येथे जुन्या कौटुंबिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे, आरोपींमध्ये एका नामांकित क्लिनिकच्या डॉक्टरचाही समावेश असल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी फातिमा बी एजाज अली (वय ५४ वर्षे) रा. शौकत कॉलनी, खामगाव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास फातिमा बी आणि त्यांचे कुटुंबीय शेगाव येथील वाटिका चौकात असलेल्या ‘अपना फर्निचर’ या दुकानात असताना, आरोपींनी संगनमत करून त्यांना गाठले. जुने कौटुंबिक कारणावरून यावेळी शाब्दिक चकमक उडाली, ज्याचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि धमकावण्यात झाले. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून “तुम्हाला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी प्रकाश लक्ष्मण तायडे याने फिर्यादीचा मुलगा शेख सोहेल याला ५० हजार रुपयांची मागणी केली. “जर पैसे दिले नाहीत, तर तुझ्यावर खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करीन आणि तुझी सरकारी नोकरी घालवीन,” अशी थेट धमकी तायडे याने दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
शेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी शेख अकबर शेख इमाम (वय अंदाजे ५० वर्षे) रा. आळसना, प्रकाश लक्ष्मण तायडे (वय अंदाजे ६५ वर्षे), रा. आळसना, डॉ. अन्सार (अल्मास क्लिनिक, रा. आझाद नगर, शेगाव) या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८ (२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के हे करत आहेत. भरदिवसा शहराच्या मुख्य चौकात अशा प्रकारे धमकावण्याचे सत्र घडल्याने व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.