https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

खळबळजनक! मलकापूरच्या गौलखेडमध्ये प्रेमप्रकरणातून तुंबळ हाणामारी; दोन्ही गटांकडून परस्परविरोधी गुन्हे दाखल

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): तालुक्यातील गौलखेड येथे काल दुपारी किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणाच्या जुन्या वादातून दोन गट समोरासमोर आले असून, यात दगडफेक, अश्लील शिवीगाळ आणि जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून गुन्हे दाखल केले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

प्रकरण १: विनयभंग आणि अश्लील शिवीगाळ

पहिल्या घटनेत चिंचपूर येथील २३ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, त्या आपल्या आईच्या घरासमोर उभ्या असताना आरोपी राम समाधान बरडे आणि लखन समाधान बरडे (रा. गौलखेड) यांनी त्यांना गाठले. यावेळी आरोपी राम बरडे याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अश्लील भाषेत पीडितेचा अपमान केला. “तुझे माझ्या भावाशी संबंध आहेत,” असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. इतकेच नव्हे तर, दोन्ही आरोपींनी फिर्यादीला लोटपाट करून तिच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ३५१ (२)(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्रकरण २: डोक्यात दगड घालून प्राणघातक हल्ला

दुसरीकडे, राम समाधान बरडे (वय २८ वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. राम बरडे यांच्या मते, त्यांचा भाऊ लखन आणि आरोपी महिला यांच्यातील प्रेमसंबंधांच्या वादातून हा सर्व राडा झाला. राम बरडे आपल्या घरासमोर बसलेले असताना आरोपी महिला व तिच्यासोबत असलेल्या एका अन्य महिला आणि पुरुषाने त्यांना घेराव घातला. “तुझा भाऊ लखन कुठे आहे?” अशी विचारणा करत आरोपींनी राम बरडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोन्ही महिला आरोपींनी त्यांना पकडून ठेवले, तर पुरुष आरोपीने राम यांच्या डोक्यावर दगडाने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या फिर्यादीला जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाले. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ३५२, ३५१ (२)(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस अंमलदार सविता मोरे ह्या करीत आहेत.

गावात दहशतीचे वातावरण

दुपारच्या सुमारास झालेल्या या राड्यामुळे गौलखेड गावात काही काळ भीतीचे वातावरण होते. प्रेमसंबंध आणि त्यातून निर्माण झालेला जातीपातीचा तणाव यामुळे हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!