अजय टप
मोताळा, (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील बेलुरा येथील एक २२ वर्षीय तरुणी राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये ‘मिसींग’ची नोंद करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून मुलीचा कसून शोध घेतला जात आहे.
बेलुरा येथील रहिवासी वासुदेव कडू मुंढे (वय ४५ वर्षे) हे शेतमजुरी करतात. त्यांची मुलगी पुनम वासुदेव मुंढे ही रविवार, २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान घरातून बेपत्ता झाली आहे. घरातील सदस्य आपापल्या कामात व्यस्त असताना पुनम कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेली. सायंकाळपर्यंत ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. नातेवाईक, मित्रमैत्रिणी आणि गावकऱ्यांकडे चौकशी करूनही तिचा कोणताही पत्ता लागला नाही.
याप्रकरणी वासुदेव कडू मुंढे यांनी बोराखेडी पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. बेपत्ता तरुणीचा रंग गोरा, बांधा मध्यम, उंची ५ फूट, केस काळे आणि लांब असून तिने अंगात गुलाबी रंगाचा पांढरे ठिपके असलेला पंजाबी ड्रेस, मळकट रंगाची सलवार आणि पायात काळ्या रंगाची चप्पल घातलेली आहे. तसेच तिच्याकडे रेडमी कंपनीचा मोबाइल आहे. उपरोक्त वर्णनाच्या तरुणीबद्दल काही माहिती मिळाल्यास बोरखेडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अंमलदार विजय सुरळकर यांनी केले आहे.