https://hindvarta.com/wp-content/uploads/2026/04/WhatsApp-Image-2026-04-29-at-10.50.45-AM.jpeg

रक्ताने माखलेला विश्वास!;साखरेखेर्ड्यात पंजाबच्या हार्वेस्टर ऑपरेटरचा निर्घृण खून; सहा तासांत पोलिसांनी आवळल्या मारेकरी ‘हेल्पर’च्या मुसक्या!

सिंदखेड राजा,(प्रतिनिधी): ज्या हातांनी सोन्यासारखं पीक कापलं, त्याच हातांनी रक्ताचे पाट वाहिले! साखरखेर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पिंपळगाव उंडा येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पंजाबवरून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या एका हार्वेस्टर ऑपरेटरचा त्याच्याच सोबत काम करणाऱ्या नराधम हेल्परने लोखंडी रॉडने वार करून निर्घृण खून केला. अपघाती मृत्यूचा बनाव रचण्याचा प्रयत्न करणाऱ्या या खुनी हेल्परचा ‘गेम’ साखरखेर्डा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत उलटवून लावला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

पंजाबमधील संगरूर जिल्ह्याचे रहिवासी असलेले करमजीत सिंग ऊर्फ मंजीत सिंग जनक सिंग (वय ५५ वर्षे) हे हार्वेस्टर ऑपरेटर म्हणून काम करत होते. त्यांच्यासोबत आरोपी बबली सिंग करण सिंग (वय ३४ वर्षे) हा हेल्पर म्हणून कामाला होता. २९ एप्रिलच्या रात्री त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात मंजीत सिंग यांनी आरोपीच्या आई-बहिणीवरून शिवीगाळ केली, असा दावा आरोपीने केला आहे. याच रागाच्या भरात बबली सिंगच्या डोक्यात सैतान संचारला. त्याने समोर पडलेला लोखंडी टामी उचलली आणि गाढ झोपेत असलेल्या मंजीत सिंग यांच्या डोक्यावर मागून सपासप वार केले. त्यामुळे मंजीत सिंग गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला.

मारेकरी बबली सिंग इतका निर्दयी होता की, मंजीत सिंग रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना त्याने त्यांचा संशय येऊ नये म्हणून चक्क त्यांच्या कानावर मोबाईल ठेवून दिला, जेणेकरून कोणाला वाटावे की ते फोनवर बोलत झोपले आहेत. इकडे मृत्यूशी झुंज देणाऱ्या मंजीत सिंग यांनी रात्री १२ च्या सुमारास मदतीसाठी आपल्या मालकाला दोन वेळा फोन केले. मात्र, दुर्दैवाने रात्रीची वेळ असल्याने मालकाने फोन उचलला नाही. डोक्याला पगडी बांधलेली असल्याने रक्तस्त्राव बाहेरून दिसला नाही आणि कोणाच्याही मदतीविना मंजीत सिंग यांनी तिथेच तडफडून प्राण सोडले.

पोलीस तपासाचा ‘खाकी’ दणका!

३० एप्रिलच्या सकाळी साडेपाच वाजता जेव्हा स्थानिक नागरिक शिवाजी काळे तिथे व्यायामासाठी आले, तेव्हा त्यांना मंजीत सिंग मृतावस्थेत आढळले. ठाणेदार गजानन करेवाड यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने फौजफाटा तैनात केला. सुरुवातीला हा नैसर्गिक मृत्यू वाटत असला, तरी पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून काहीच सुटले नाही. ठाणेदार करेवाड यांनी सात जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी सुरू केली. यामध्ये अमित कुमार नावाचा इसम मृतासोबत झोपायचा, तर इतर हार्वेस्टरजवळ लांब झोपायचे. पोलिसांनी आपला ‘खाकी इंगा’ दाखवताच अमित कुमार पोपटासारखा बोलू लागला. त्याने आरोपी आणि मृतामध्ये झालेल्या वादाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी बबली सिंगला ताब्यात घेऊन हिसका दाखवताच त्याने आपला गुन्हा मान्य केला.

यांनी लावला गुन्ह्याचा छडा

अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन करेवाड, दुय्यम ठाणेदार संदीप मेघने, पोलीस अंमलदार लक्ष्मण इनामे, नीलेश मोरे आणि फॉरेन्सिक टीमने या गुन्ह्याचा छडा लावला. आरोपीने गजरखेड फाट्यावरील एका टिनशेडसमोर लपून बसल्याची कबुली दिली होती, तिथूनच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

कुटुंबीयांची प्रतीक्षा आणि आक्रोश

मंजीत सिंग यांचा मृतदेह सध्या मेहकर येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. पंजाबमधील त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून, ते आल्यानंतरच मृतदेह त्यांच्या स्वाधीन केला जाणार आहे. पोटासाठी हजारो मैल दूर आलेल्या एका कष्टकऱ्याचा अशा प्रकारे अंत होणे, हे समाजासाठी सुन्न करणारे आहे. मात्र, ‘गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो पुरावा सोडतोच’ हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!