अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गेल्या २४ तासांत गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये शेळ्यांची चोरी, कौटुंबिक कलहातून होणारे प्राणघातक हल्ले, रस्ते अपघात आणि विनयभंग सदृश शिवीगाळीच्या घटनांचा समावेश आहे. नांदुरा, शेगाव, मलकापूर आणि तामगाव परिसरात या घटना घडल्या असून पोलीस प्रशासनाने गुन्हे दाखल करून तपास चक्रावली वेगाने फिरवली आहेत.
तामगाव: ‘इर्टिगा’तून आलेल्या चोरांनी लांबवल्या ६० हजारांच्या शेळ्या
तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पातुर्डा बुद्रुक येथे एका धाडसी चोरीची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी दाऊद शहा मुनीर शहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० एप्रिलच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वाड्याचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने फोन करून माहिती दिली की, घरासमोर एक ग्रे रंगाची ‘इर्टिगा’ कार उभी असून काही लोक वाड्यात घुसत आहेत. फिर्यादी बाहेर येईपर्यंत चोरटे गाडीसह पसार झाले होते. तपासणी केली असता, वाड्यातील ३० हजार रुपये किमतीच्या तीन बकऱ्या, १५ हजारांचा बोकड आणि १५ हजारांचा एडका असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. पोलीस हवालदार प्रमोद मुळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
शेगाव ग्रामीण: दारूच्या वादातून मुलाने फोडले बापाचे डोके
शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वरखेड बुद्रुक येथे कौटुंबिक हिंसेची एक संतापजनक घटना घडली आहे. पुणे येथे हमालीचे काम करणारे प्रमोद आत्माराम इंगळे हे ३० एप्रिल रोजी घरी परतले असता, त्यांनी दारू प्यायली होती. यावरून पत्नी देवकन्या इंगळे यांच्याशी त्यांचा वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि पत्नीने मुलगा प्रतीक याला पाचारण केले. रागाच्या भरात मुलगा प्रतीक याने स्वतःच्या वडिलांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि डोक्यात दगड मारून त्यांना गंभीर जखमी केले. रक्ताने माखलेल्या अवस्थेत वडिलांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार मेटांगे पुढील तपास करत आहेत.
नांदुरा: दुकानावर जाऊन महिलेला अश्लील शिवीगाळ व धमकी
नांदुरा शहरात एका महिला व्यापाऱ्याला अश्लील शिवीगाळ करून धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादी सौ. उज्वला विशाल भोपळे यांच्या कटलरीच्या दुकानावर आरोपी महिला (पाटील नामक) आपल्या दोन साथीदारांसह आली. ‘पट्टा पोथ’ परत देण्याच्या कारणावरून हा वाद झाला.
फिर्यादीने “मुलगी कामावरून घरी गेली आहे, उद्या सकाळी या” असे सांगितले असता, आरोपी महिलेने भररस्त्यात अश्लील भाषेत शिवीगाळ करत फिर्यादीचा अपमान केला. तसेच “उद्या बघून घेऊ” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. नांदुरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार सय्यद तपास करत आहेत.
मलकापूर (दसरखेड): घरी जा म्हटल्याचा राग, मजुरावर दगडफेक
मलकापूर तालुक्यातील नरवेल येथे दारूच्या नशेत असलेल्या तरुणाला समज देणे एका मजुराच्या अंगाशी आले. फिर्यादी सुरेश पंढरी सावळे हे घरी जात असताना आरोपी आकाश दादाराव सावळे हा दारू पिऊन रस्त्यात उभा होता. “तू दारू प्यायलेला आहेस, घरी जाऊन झोप” असे फिर्यादीने प्रेमाने सांगितले.
याचा राग येऊन आकाशने हातातील दगड सुरेश सावळे यांच्या डाव्या डोळ्याच्या वर मारला, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एमआयडीसी दसरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास राजेश बावणे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
नांदुरा अपघात: अज्ञात टिप्परच्या धडकेत महिला गंभीर जखमी
रस्ते अपघाताची एक घटना कोलासर ते शेलगाव मुकुंद रोडवर घडली. फिर्यादी दर्शन अरुण देशमुख आणि त्यांची मोठी आई शिला विजय देशमुख हे मोटारसायकलने एमएच-२८-एएस-६०४९ शेतातून घरी परतत होते. यावेळी समोरून येणाऱ्या एका अज्ञात टिप्पर चालकाने त्यांच्या दुचाकीला कट मारला. या अपघातात दुचाकी खाली पडल्याने शिला देशमुख यांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघात घडल्यानंतर टिप्पर चालक मदतीसाठी न थांबता घटनास्थळावरून पळून गेला. नांदुरा पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार चिखलकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. जिल्ह्यात वाढत्या चोरीच्या घटना पाहता नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
