बुलढाणा,(प्रतिनिधी): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नावावरून वादंग निर्माण झाले आहे. ते नाव म्हणजे बच्चू कडू. ज्या माणसाने आयुष्याची २५ वर्षे सत्तेच्या सोपानासाठी नव्हे, तर शेवटच्या माणसाच्या हक्कासाठी झिजवली, ज्याने स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता हजारो आंदोलने अंगावर घेतली, त्याच माणसाला आज सोशल मीडियाच्या कट्ट्यावर आणि राजकीय वर्तुळात टीकेचे धनी केले जात आहे. ‘प्रहार’ची ताकद कायम ठेवत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) सोबत जाण्याचा निर्णय घेतला, आणि अचानक काही लोकांसाठी बच्चू कडू ‘खलनायक’ ठरले. पण प्रश्न असा उरतो की, हे टीकास्त्र वैचारिक आहे की एखाद्या जाणीवपूर्वक आखलेल्या ‘सुपारी’चा भाग?
आज जे नेटकरी किंवा राजकीय विरोधक बच्चू कडू यांच्यावर चिखलफेक करत आहेत, त्यांनी कदाचित २५ वर्षांपूर्वीचा इतिहास वाचला नसावा. कुठलेही राजकीय घराणे पाठीशी नसताना, खिशात पैसा नसताना आणि हाताला सत्ता नसताना एका सामान्य कुटुंबातील तरुणाने ‘प्रहार’ नावाची संघटना उभी केली. ही केवळ संघटना नव्हती, तर ते अन्यायग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांचे न्यायालय होते.
विदर्भाच्या मातीतून उभा राहिलेला हा माणूस जेव्हा मंत्रालयाच्या पायऱ्या चढतो, तेव्हा तो स्वतःच्या कामासाठी नाही, तर पेन्शन रखडलेल्या वृद्धेसाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी पैसे नसणाऱ्या रुग्णासाठी असतो. ज्या वयात लोक करिअर आणि बँक बॅलन्स बघतात, त्या वयात बच्चू कडू यांनी अंगावर गुन्हे दाखल करून घेतले. आज त्यांच्यावर साडेतीनशेहून अधिक गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे चोरीचे नाहीत, फसवणुकीचे नाहीत, तर ते गरिबांच्या हक्कासाठी पुकारलेल्या एल्गाराचे पुरावे आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांचे विलीनीकरण किंवा युती करणे ही काही नवीन बाब नाही. पण बच्चू कडू यांच्यावरच टीकेची झोड का?
- शरद पवार यांनी आपला छोटा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला, तेव्हा ती ‘चाणक्यनीती’ ठरली.
- नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला, तेव्हा तो ‘विकासाचा मार्ग’ वाटला.
- छगन भुजबळ यांनी आपल्या राजकीय प्रवासात घेतलेले निर्णय हे ‘प्रगल्भता’ मानले गेले.
मग प्रश्न असा पडतो की, बच्चू कडू यांनी आपल्या संघटनेचे अस्तित्व कायम ठेवत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, तर त्याला ‘गद्दारी’ किंवा ‘स्वार्थ’ का म्हटले जावे? बच्चू कडू यांनी सत्तेसाठी कधीही आपले तत्त्व सोडले नाही. दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून घेणारा हा देशातील पहिला लोकप्रतिनिधी आहे. सत्तेचा वापर त्यांनी स्वतःची घरे भरण्यासाठी केला असता, तर आज ते राज्यातील सर्वात श्रीमंत नेत्यांच्या यादीत असते. पण आजही हा माणूस तळागाळातील लोकांसाठी धावताना दिसतो, हे नाकारून चालणार नाही.
किडन्या निकामी झाल्या, तेच आरोपीच्या पिंजऱ्यात?
वारंवार आंदोलने, हजारो मैलांचा प्रवास आणि मुख्य म्हणजे ‘उपोषण’ हे बच्चू कडू यांचे सर्वात मोठे शस्त्र राहिले आहे. सततच्या उपोषणांमुळे त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाले. वैद्यकीय अहवाल सांगतात की, प्रदीर्घ उपोषणांमुळे त्यांच्या किडन्या निकामी होण्यापर्यंत परिस्थिती ओढावली होती. रक्ताचे पाणी करून ज्याने सामान्यांच्या आयुष्यात प्रकाश आणला, त्यालाच आज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे ही महाराष्ट्राची ‘वैचारिक दिवाळखोरी’ नाही तर काय?, “ज्या माणसाने १५० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून शेकडो लोकांचे प्राण वाचवले, ज्याने अनाथ आणि दिव्यांगांना आपले कुटुंब मानले, त्याच्या निष्ठेवर शंका घेणाऱ्यांनी एकदा स्वतःच्या मनाला विचारून पाहावे की, समाजासाठी त्यांनी कधी साधी जखम तरी अंगावर घेतली आहे का?”, याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
रुग्णसेवा हाच ज्याचा श्वास
राजकारण एकवेळ बाजूला ठेवले तरी बच्चू कडू यांचे रुग्णसेवेतील योगदान हिमालयाएवढे आहे. मध्यरात्री कुणीही फोन केला तरी “दवाखान्यात जा, मी बघतो” असे म्हणणारा हा लोकनेता आहे. अमरावतीच्या दवाखान्यातून ते मुंबईच्या केईएमपर्यंत, बच्चू कडू यांचे नाव घेतल्यावर गरिबांना धीर मिळतो. कोरोना काळात जेव्हा मोठे मोठे नेते घराबाहेर पडायला घाबरत होते, तेव्हा बच्चू कडू रस्त्यावर उतरून पीपीई किट घालून रुग्णांची सेवा करत होते. रक्ताची नाती जेव्हा दूर पळत होती, तेव्हा हा माणूस बेवारस मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी पुढे येत होता, हे महाराष्ट्र का विसरतोय.
टीकेची रसद आणि ‘बिनडोक’ ट्रोलिंग
सध्या सोशल मीडियावर बच्चू कडू यांच्याविरुद्ध जे वातावरण तयार केले जात आहे, त्यामागे एक विशिष्ट ‘पिलावळ’ कार्यरत असल्याचे स्पष्ट दिसते. ही तीच मंडळी आहेत ज्यांनी कधीही सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला नाही, पण एसी केबिनमध्ये बसून क्रांतीच्या गप्पा मारतात. विरोधी राजकीय पक्षांची रसद घेऊन कुणाची तरी बदनामी करण्याची ‘सुपारी’ घेतलेल्या या टोळ्यांना बच्चू कडूंचे महत्त्व कधीच कळणार नाही. ज्याला गरिबांच्या अश्रूंची किंमत कळते, त्याला बच्चू कडू कळतात. ज्याला शेतकरी बापाच्या हातावरचे फोड दिसतात, त्याला प्रहार कळतो.
हा प्रहार थांबणार नाही!
एखाद्या माणसाला बदनाम करणे सोपे असते, पण त्याच्यासारखे आयुष्य जगणे कठीण असते. बच्चू कडू यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो, पण तो त्यांच्या सामाजिक कार्याला तडा देणारा नक्कीच नाही. सत्तेत राहून त्यांनी दिव्यांगांसाठी जे काम केले, ते गेल्या ७० वर्षांत कुणीही करू शकले नव्हते. टीका करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, सोन्याला कितीही आगीत टाकले तरी त्याची झळाळी कमी होत नाही. बच्चू कडू हे संघर्षाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेले नेतृत्व आहे. आज जरी त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न होत असला, तरी उद्याचा इतिहास साक्ष देईल की, जेव्हा महाराष्ट्र सुस्त होता, तेव्हा एक ‘बच्चू’ सामान्यांच्या हक्कासाठी रक्ताचं पाणी करत होता. हा केवळ बच्चू कडूंचा अपमान नाही, तर त्या प्रत्येक दिव्यांगाचा, शेतकऱ्याचा आणि रुग्णाचा अपमान आहे ज्यांच्यासाठी बच्चू कडू देवदूत ठरले आहेत. आता वेळ आली आहे या ‘वैचारिक दिवाळखोरी’वर पुन्हा एकदा जोरात ‘प्रहार’ करण्याची!
