अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): ज्या ठिकाणी गुन्हेगारांना घाम फुटतो, जिथे सर्वसामान्य नागरिक न्यायाच्या आशेने पाऊल ठेवतात आणि जिथून शहराच्या नैतिकतेचे रक्षण केले जाते, त्याच मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सध्या काहीतरी वेगळंच ‘कांड’ शिजत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. पोलीस ठाण्यातील मुतारीची अवस्था पाहिल्यास, हे शासकीय कार्यालय आहे की एखाद्या स्वस्त लॉजचा कोपरा, असा प्रश्न पडावा इतकी विदारक स्थिती निर्माण झाली आहे.
पोलीस ठाण्याच्या मुतारीमध्ये साचलेली घाण आणि दुर्गंधी तर पाचवीलाच पुजलेली आहे, मात्र आता त्यात एका नवीन आणि अश्लील भर पडली आहे. या मुतारीमध्ये चक्क वापरलेले कंडोम पडलेले आढळून येत आहेत. ही बाब निव्वळ स्वच्छतेचा अभाव दर्शवणारी नाही, तर पोलीस प्रशासनाच्या नाकाखाली चालणाऱ्या अनैतिक कृत्यांवर शिक्कामोर्तब करणारी आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या पोलिसांच्या अगदी काही फुटांच्या अंतरावर जर मुतारीमध्ये असे ‘शृंगाराचे पुरावे’ सापडत असतील, तर कायद्याचा धाक राहिला कुणावर? हा खरा प्रश्न आहे.
मुतारी की ‘अनैतिकतेचा अड्डा’?
मुतारीतील हे चित्र पाहून असे वाटते की, रात्रीच्या वेळी किंवा संधी मिळेल तेव्हा या शासकीय वास्तूचा वापर काही महाभाग चक्क ‘मदनबाण’ सोडण्यासाठी करत आहेत. पोलीस ठाण्याच्या परिसरात जिथे चोवीस तास पोलिसांचा वावर असतो, तिथे बाहेरील व्यक्ती येऊन हे कृत्य करतात की ठाण्यातीलच कुणी ‘रंगेल’ महाशय येथे आपली हौस भागवत आहेत, याचा तपास होणे आता गरजेचे झाले आहे. मुतारीत पडलेले ते कंडोम प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे धिंडवडे काढत आहेत.
स्वच्छतेचा ‘राम’ आणि शिस्तीचा ‘काम’
एकीकडे सरकार ‘स्वच्छ भारत अभियान’ राबवत आहे, तर दुसरीकडे पोलीस ठाण्यातील ही घाण पाहून कोणाचेही डोकं चक्रावून जाईल. मुतारीची भिंत आणि फरशीवर साचलेला तो पिवळधमक थर आणि त्यात पडलेले ते कंडोम, हे दृश्य मलकापूर पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासणारे आहे. जर स्वतःच्या घरातील (पोलीस स्टेशनमधील) घाण आणि अनैतिकता पोलीस साफ करू शकत नसतील, तर शहरातील गुन्हेगारी ते कशी काय साफ करणार?
जनतेमध्ये संतापाची लाट
पोलीस ठाण्यात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना या दुर्गंधीचा आणि त्या ओंगळवाण्या दृश्यांचा सामना करावा लागत आहे. आम्ही तक्रार द्यायला येतो की तुमची घाण बघायला?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. पोलीस ठाण्याच्या सुरक्षित वातावरणात जर अशा गोष्टी घडत असतील, तर सुरक्षित जागा उरली तरी कुठे?
साहेबांच्या ‘डिटेक्शन’ची आता खरी कसोटी!
एरवी किरकोळ गुन्हेगारांना शोधून काढणारे मलकापूर पोलीस आता स्वतःच्याच आवारातील या ‘कंडोम प्रकरणा’चा शोध घेणार का? ही मुतारी स्वच्छ करून तिथे शिस्त लावली जाईल की, ‘आमच्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय आहे’ असे म्हणत हे प्रकरण दाबले जाईल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आता तरी पोलीस अधीक्षकांनी या प्रकाराची दखल घेऊन, मलकापूर शहर पोलीस ठाण्यातील या ‘मुतारी पुराण’ला पूर्णविराम द्यावा आणि स्वच्छतेसोबतच नैतिकतेचेही रक्षण करावे, हीच माफक अपेक्षा.
