चिखली,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): चिखली शहरातील गजबजलेल्या बॉम्बे मार्केट परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. बोन्द्रे पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या जहीर खान कुरेशी यांच्या भंगार दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच दुकानातील मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे पेट्रोल पंपाच्या अगदी शेजारीच आग लागल्यामुळे काही काळ परिसरात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग आणि पोलिस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. आग विझवण्याच्या कार्यात उपनगराध्यक्षपती कपिल खेडेकर, पाणीपुरवठा सभापती दत्ता सुसर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही पुढाकार घेत मदतकार्य केले. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण चिखली शहरात एकच खळबळ उडाली आहे.
