बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बेकायदेशीर ऑनलाइन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी सवलतींमुळे निर्माण झालेल्या अनिष्ट स्पर्धेच्या विरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD) येत्या २० मे २०२६ रोजी देशव्यापी बंद पुकारला आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील औषध विक्रेते १०० टक्के सहभागी होणार असल्याचा निर्धार राज्य संघटनेने व्यक्त केला आहे.
औषधी व्यवसाय हा ‘ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट १९४०’ अंतर्गत चालतो, ज्यामध्ये ऑनलाइन औषध विक्रीबाबत कोणतीही तरतूद नाही. केंद्र सरकारने २८ ऑगस्ट २०१८ रोजी काढलेल्या जी.एस.आर. ८१७ (E) या नोटिफिकेशनचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही, तरीही देशभर बेकायदेशीर ऑनलाइन विक्री सुरू आहे. कोरोना काळात औषधांच्या होम डिलिव्हरीसाठी तात्पुरती दिलेली सवलत (GSR 220(E)) पाच वर्षे उलटूनही सरकारने रद्द केलेली नाही. याचा फायदा घेऊन कॉर्पोरेट कंपन्या ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्था धोक्यात आणत आहेत. ‘ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर’ (DPCO) २०१३ नुसार किरकोळ विक्रेत्यांना १६ टक्के नफा मिळतो, तर ऑनलाइन कंपन्या २० टक्के ते ५० टक्के सवलत देतात. यामुळे देशातील १२.५० लाख औषध विक्रेत्यांचा व्यवसाय संकटात आला आहे.
विक्रेत्यांना डॉक्टरांनी लिहिलेल्या औषधासारखेच दुसरे नामांकित औषध (Brand Substitute) देण्याचा अधिकार मिळावा, जेणेकरून ते कॉर्पोरेट कंपन्यांशी स्पर्धा करू शकतील. एआयओसीडीचे (AIOCD) अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, आम्ही संबंधित मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निवेदने देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती, मात्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे औषध विक्रेत्यांमध्ये तीव्र संताप असून आंदोलनाचे पाऊल उचलणे भाग पडले आहे. राज्य संघटनेचे सचिव अनिल नावंदर यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील सर्व सभासद या बंदमध्ये सहभागी होण्यास तयार आहेत. सरकारने मागण्यांचा विचार न केल्यास पुढील आंदोलनामुळे जनतेला होणाऱ्या त्रासास शासन जबाबदार असेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. बुलढाणा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे (BDCDA) अध्यक्ष गजानन शिंदे आणि सचिव रामचंद्र आयलाणी यांनी जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांना या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
