अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत ३ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. धाड नाका परिसरात केलेल्या या कारवाईत विदेशी दारूचा मोठा साठा आणि एक कार जप्त करण्यात आली असून एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातच अवैध धंद्याचे असे स्तोम माजलेले असेल तर जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल, याची कल्पनाही न केलेली बरी.
पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रणिक लोढा यांनी जिल्ह्यातील अवैध दारू विक्री आणि वाहतुकीवर कडक निर्बंध घालण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात गस्त आणि तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. १० मे २०२६ रोजी एलसीबीच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, रायपूर रोडवरील धाड नाका परिसरात अवैध दारूची वाहतूक होणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सूर्योदय हॉटेलसमोर सापळा रचला. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या एका हुंडई ईऑन कारची तपासणी केली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३ लाख ५२ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामध्ये
विदेशी दारू ५२,०६० रुपये किमतीचा विविध ब्रँड्सचा दारूसाठा. ३ लाख रुपये किमतीची जुनी वापरती हुंडई ईऑन कारचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा (प्रोव्हिबिशन) कलम ६५ (अ) आणि (इ)** नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार पथकातील पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, चांद शेख, महिला पोलीस अंमलदार आशा मोरे यांनी केली.
