अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात सध्या गुन्हेगारांनी जणू धुमाकूळ घातला आहे. मागील ४८ तासांतील गुन्ह्यांची मालिका पाहिली, तर “कायद्याचे राज्य” नक्की कोणासाठी आहे, असा प्रश्न पडतो. कुठे लग्नाच्या पार्टीत रक्ताच्या चिळकांड्या उडत आहेत, कुठे धार्मिक भावना पायदळी तुडवल्या जात आहेत, तर कुठे शेतकऱ्याच्या कष्टाचा घास (ज्वारीचा गंज) अज्ञात शत्रू राख करून टाकत आहेत. एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे जिल्हा पोलीस प्रशासनाची पकड ढिली झाली आहे की गुन्हेगारांना खाकीची भीती उरलेली नाही, असा ‘मार्मिक’ सवाल आता सामान्य जनता विचारू लागली आहे.
वाढदिवसाच्या पार्टीत बीअरच्या बाटल्यांनी वार; मैत्रीचा हा कसला अवतार?
खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरसगाव देशमुख येथे वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण, जिथे जेवणाची मेजवानी व्हायला हवी होती, तिथे दारूच्या नशेत बीअरच्या बाटल्यांनी एकमेकांवर वार करण्यात आले. मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याची ही घटना समाजातील वाढत्या विकृतीचे दर्शन घडवणारी आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१, ३५२ अन्वये गुन्हा दाखल करून सोपस्कार पूर्ण केले असले, तरी अशा राड्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
श्रद्धेवर आघात आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न
सोनाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंगळी बुद्रुक येथे साकरा देवी आणि कालभैरवनाथ यांच्या मूर्ती व ओट्याची तोडफोड करून धार्मिक भावना दुखावण्यात आल्या. एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे का? की पोलीस प्रशासनाचा गुप्तचर विभाग पूर्णपणे झोपलेला आहे? अशा घटनांमुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची पुसटशी कल्पना तरी प्रशासनाला आहे का?, असे प्रश्न कायदप्रिय नागरिक विचारत आहेत.
शेतकऱ्यांच्या कष्टाची होळी; ३५ पोते ज्वारी खाक!
जलंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलुरा शिवारात एका अज्ञात नराधमाने संदीप विष्णू देवाचे यांच्या शेतात असलेला ज्वारीचा गंज पेटवून दिला. यात अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. घाम गाळून पिकवलेली लक्ष्मी डोळ्यासमोर जळताना पाहून शेतकऱ्याचा काळजाचा थरकाप उडाला असेल, पण पोलीस तपासाचा गाडा मात्र ‘अज्ञात आरोपी’च्या टॅगखाली रखडलेलाच दिसतो. शेतकऱ्याला न्याय मिळणार की ही फाइलही धूळ खात पडणार?, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
शेगावनगरीत चोऱ्यांचा सुळसुळाट; पावन नगरी अपावन करण्याचा प्रयत्न
संतनगरी शेगाव शहरात अज्ञात चोरट्यांनी गजानन कराळे आणि विठ्ठल सदर यांच्या घराचे कुलूप तोडून तब्बल ५६ हजार ५०० रुपयांचे सोने-नाणे आणि रोख रक्कम लंपास केली. चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक आता घरी कुलूप लावून बाहेर जायलाही घाबरत आहेत. सुरक्षित शहर, हा दावा केवळ कागदावरच मर्यादित राहिला आहे का?, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
घरगुती हिंसाचार आणि अल्पवयीन विवाहाचा शाप
तामगाव येथे एका नराधम पतीने चक्क स्वतःच्या पत्नीला काठीने झोडपले आणि पोटच्या मुलांना विहिरीत फेकून देण्याची धमकी दिली. दुसरीकडे, जळगाव जामोदमध्ये १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याची घटना उघडकीस आली. या घटनांवरून जिल्हा महिला व बालकल्याण विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो.
अपघाती मृत्यू आणि आत्महत्येचे सत्र
मलकापूर आणि धामणगाव बढे परिसरात अपघाती आणि संशयास्पद मृत्यूंची मालिका सुरू आहे. रेल्वे रुळावर ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह मिळणे, मोटारसायकल स्वराचा स्वतःच्याच हलगर्जीपणामुळे मृत्यू होणे किंवा शेगाव ग्रामीणमध्ये एका शेतकऱ्याने गळफास घेणे, या सर्व घटना जिल्ह्याच्या सामाजिक आणि मानसिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आहेत.
बुलढाणा जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण सध्याची परिस्थिती पाहता पोलीस प्रशासनाने आपले ‘खाकी’ कवच कडक करण्याची गरज आहे. केवळ गुन्हे दाखल करून आणि तपास सुरू आहे, असे म्हणून जबाबदारी झटकता येणार नाही. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर जिल्हा गुन्हेगारांचे नंदनवन बनायला वेळ लागणार नाही, एवढे मात्र खरे!
