शेगाव हादरले! वासनांध हॉटेल मालकाचे काळं कृत्य; महिला कर्मचाऱ्याचे अंघोळीचे फोटो काढून केला लैंगिक अत्याचार

 

अजय टप

शेगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):संतनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगावमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. ज्या शहरात लाखो भाविक श्रद्धेने नतमस्तक होतात, त्याच शहरात एका नराधम हॉटेल मालकाने आपल्याच महिला कर्मचाऱ्याचा विश्वासघात करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडित महिलेचे अंघोळ करतानाचे फोटो आणि व्हिडिओ चोरून काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्या असहायतेचा फायदा घेतला. या घटनेमुळे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

शेगाव शहरातील खामगाव मार्गावर एक प्रसिद्ध हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये अनेक गरजू महिला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कर्मचारी म्हणून काम करतात. याच हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्यावर हॉटेल मालकाची वक्रदृष्टी पडली. मालक या नात्याने संरक्षणाची जबाबदारी असताना, लिप्ते याने नीचतेची सर्व सीमा ओलांडली. काही दिवसांपूर्वी पीडित महिला हॉटेलच्या परिसरात अंघोळ करत असताना, नराधम आरोपीने चोरून तिचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. हे फोटो आपल्याकडे असल्याचे सांगून त्याने “जर माझे ऐकले नाही, तर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी बदनामी करेन, असे म्हणत पीडितेचे मानसिक खच्चीकरण केले.

बदनामीच्या भयापोटी महिलेचे शोषण

समाज आणि कुटुंबात होणाऱ्या बदनामीच्या भीतीमुळे पीडित महिला सुरुवातीला गप्प राहिली. याच भीतीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले. इतकेच नव्हे तर, पीडितेने जेव्हा या कृत्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिला तिच्या जातीवरून अत्यंत हीन दर्जाच्या शिव्या देत तिचा अपमान केला. कामावरून काढून टाकण्याची आणि जिवंत मारण्याची धमकी देऊन त्याने या महिलेला नरकयातना भोगायला लावल्या.

नराधम मालकाचा छळ सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर पीडितेने शेगाव पोलीस स्टेशन गाठले. आपल्यासोबत घडलेली सर्व आपबिती तिने पोलिसांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून शेगाव पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि विनयभंग. तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत बेकायदेशीर फोटो आणि व्हिडिओ काढणे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे.

शेगाव शहरात संतापाचा वणवा

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. शेगाव हे संतांचे शहर आहे, येथे येणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. एका सुप्रसिद्ध हॉटेलचा मालक जर अशा प्रकारे विकृत कृत्ये करत असेल, तर काम करणाऱ्या महिलांनी कुणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

खबरदारीचा इशारा

हॉटेल व्यवसायातील ही घटना एक गंभीर धोक्याची घंटा आहे. अनेक ठिकाणी महिला कर्मचारी सुरक्षित आहेत का? सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर गुन्हे रोखण्यासाठी होतो की कोणाचे खासगी आयुष्य टिपण्यासाठी? यावर आता प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!