‘एलसीबी’चे चिखलीत ‘मिशन परिवर्तन’; तब्बल साडेचार लाखांचा गांजा जप्त, आरोपी गजाआड!

चिखली,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने अंमली पदार्थ तस्करांविरुद्ध पुकारलेल्या युद्धात रविवारी (दि. १६) आणखी एक मोठे यश संपादन केले आहे. जिल्ह्याला नशामुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ‘मिशन परिवर्तन’ अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा आणि चिखली पोलिसांनी संयुक्त रित्या मोठी कारवाई केली. चिखली शहरातील इंदिरानगर भागात घरातच बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या एका अट्टल तस्कराला बुलढाणा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ९ किलो २१५ ग्रॅम वजनाचा आणि ४ लाख ६० हजार ७५० रुपये किमतीचा अवैध गांजा जप्त करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे चिखली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात अंमली पदार्थांची छुप्या पद्धतीने तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

चिखली येथील इंदिरानगर भागात राहणारा सय्यद समीर सय्यद सलीम हा आपल्या राहत्या घरातूनच अंमली पदार्थ असलेल्या गांजाची बेकायदेशीरपणे विक्री करत होता. तरुण पिढीला नशेच्या आहारी ढकलणारा हा काळा व्यवसाय अत्यंत गुप्त पद्धतीने सुरू होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या गुप्तहेरांनी या संदर्भात अचूक माहिती काढली आणि या काळ्या धंद्याचा पर्दाफाश केला. शनिवारी, १६ मे रोजी पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशान्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक यशोदा कणसे, पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे, अरविंद बडगे, रवी भिसे, अमोल वनारे, मंगेश सनगाळे, सतीश नाटेकर, दीपक वायाळ, समाधान टेकाळे यांनी चिखली येथील संशयित आरोपीच्या घरावर अचानक छापा टाकला. पोलिसांची अचानक एन्ट्री होताच आरोपीची पळापळ झाली, मात्र सतर्क पोलीस पथकाने त्याला चहुबाजूंनी वेढा घालून जागीच ताब्यात घेतले. घराची कसून झडती घेतली असता, पोलिसांना मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ गांजा आढळून आला.

४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलीस पथकाने घटनास्थळावरून ९ किलो २१५ ग्रॅम वजनाचा गांजा, ज्याची बाजारपेठेतील किंमत तब्बल ४ लाख ६० हजार ७५० रुपये आहे. हा संपूर्ण मुद्देमाल कायदेशीर सोपस्कार पार पाडून, पुढील सखोल कारवाईसाठी आणि न्यायालयाच्या प्रक्रियेसाठी चिखली पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी सय्यद समीर सय्यद सलीम याच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम ८ ( सी) आणि २० (बी)(ii)(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, हा गांजा त्याने कुठून आणला होता आणि तो चिखली परिसरात कोणाकोणाला विकणार होता, याच्या मुख्य सुत्रधाराचा शोध आता पोलीस घेत आहेत. चिखली सारख्या गजबजलेल्या शहरात चालणाऱ्या या अवैध धंद्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळे सुजाण नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तरुण पिढीला उद्ध्वस्त करणाऱ्या अशा प्रवृत्तींचा वेळीच बिमोड करणे गरजेचे होते, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!