अजय टप
मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो):शहरालगत असलेल्या जग्गु मामा ढाब्यापाशी एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव अज्ञात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने यवतमाळ जिल्ह्यातील ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दारबा नगर (वाडेगाव, जि. यवतमाळ) येथील रहिवासी असलेले ध्रुव साहेबराव लांजेवार हे आपल्या दुचाकीने जात असताना, जग्गु मामा ढाब्याजवळ एका अज्ञात ट्रकने त्यांच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की ध्रुव लांजेवार हे गंभीररित्या जखमी झाले. अपघात घडताच त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. शुभांगी फेंगडे यांच्या वतीने कक्षसेवक संतोष कडू गवळी यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मर्ग दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम बरदाडे हे करत असून, अपघात करून पळून गेलेल्या अज्ञात ट्रकचा आणि त्याच्या चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
