जुगार आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर पोलिसांचा हातोडा; विविध पोलीस स्टेशन हद्दीत ५ गुन्हे दाखल

अजय टप

बुलढाणा, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काल, २५ मे रोजी बोराखेडी, मेहकर आणि बुलढाणा सिटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून जुगार आणि अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या आदेशान्वये या कारवाया करण्यात आल्या. यामध्ये बोराखेडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरली मटका जुगारावर कारवाई करण्यात आली. यामध्ये एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून २ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अंमलदार विजय पैठणे, राकेश नायडू, निलेश राजपूत यांच्या पथकाने केली. मेहकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी वेगवेगळ्या दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले असून पहिल्या कारवाईत नगदी आणि वरली मटका साहित्य मिळून २ हजार १०० रुपयांचा, तर दुसऱ्या कारवाईत नगदी आणि वरली मटका साहित्य मिळून १ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोलीस अंमलदार शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, अमोल अंभोरे, पुंड यांच्या पथकाने केली. तर बुलढाणा सिटी पोलिसांनी एका गुप्त माहितीच्या आधारे जिल्हा कारागृहाच्या पाठीमागील ‘धार वाले बाबा दर्गा’ परिसरात अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली. येथे गांजा/तंबाखूचे सेवन करणाऱ्यांवर एनडीपीएस ऍक्ट कलम ८(क), २७ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत दोन चिलम, गांजा-तंबाखू सदृश्य राख, छोटा दगड, कापडी चिंध्या आणि माचिस यांसह गुन्ह्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोलीस अंमलदार दीपक लेकुरवाळे, चांद शेख, गणेश पाटील, भारत जाधव, महिला पोलीस अंमलदार आशा मोरे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!