अजय टप
खामगाव,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): पिंपळगाव राजा ते तरवाडी रोडवरील एका टीनपत्र्याच्या गोदामावर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून तब्बल २ लाख रुपये किमतीचा गांजा आणि संशयास्पद शासकीय राशनचा तांदूळ जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी मोहम्मद अतीक मोहम्मद शफीक (वय २९ वर्षे) रा.गुलझार पुरा, पिंपळगाव राजा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसूल आणि पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष करण्यात आलेल्या या कारवाईत ५० हजार रुपये प्रति किलो दराचा ४ किलोग्रॅम गांजा (किंमत २ लाख रुपये) जप्त करण्यात आला. तसेच गोदामात सार्वजनिक वितरण प्रणालीतील (राशनचा) असल्याच्या संशयावरून २३ क्विंटल ६२ किलो वजनाच्या ४७ तांदळाच्या पोत्या जप्त करण्यात आल्या आहेत. या तांदळाबाबत चौकशी करण्यासाठी तहसीलदार खामगाव यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध NDPS कायदा १९८५ च्या कलम ८(क), २०(ब), २०(ब)(ii) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउपनि किशोर बर्वे करत आहेत.
२ लाखांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ; पतीसह सासरच्या ६ जणांवर गुन्हा
साखरखेर्डा: जागा खरेदी करण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी एका २६ वर्षीय विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना शेंदुरजन येथे घडली आहे. फिर्यादी सौ. कोमल अंकुश डोंगरे यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिसांनी सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींमध्ये पती अंकुश भिमराव डोंगरे, दीर अक्षय डोंगरे, प्रविण डोंगरे, सासरे भिमराव डोंगरे, सासू विमल डोंगरे (सर्व रा. वेणी, ता. लोणार) आणि नणंद सीमा सुनील शिराळे (रा. भोरसा, ता. चिखली) यांचा समावेश आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ‘घरातील कामधंदा नीट येत नाही’ या कारणावरून तिला सतत शिवीगाळ व मारहाण करण्यात आली आणि पैशांची मागणी पूर्ण न केल्यास नांदवणार नाही अशी धमकी दिली. महिला तक्रार निवारण केंद्र (भरोसा सेल) च्या चौकशी अहवालानंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सफौ रामदास वैराळ करत आहेत.
बोराखेडी: मोताळा-मल्कापूर रोडवरील श्री पेट्रोल पंपाजवळ एका मालवाहू गाडीच्या (छोटा हत्ती) चालकाने वाहन निष्काळजीपणे रिव्हर्स घेतल्याने झालेल्या विचित्र अपघातात एका २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अविनाश सुभाष माताळे पाटील (रा. मोताळा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
फिर्यादी सुभाष पंढरी माताळे यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, त्यांचा आयशर ट्रॅक्टर रोडच्या बाजूला उभा होता आणि अविनाश ट्रॅक्टरजवळ थांबला होता. दरम्यान, आरोपी मालवाहू गाडी (छोटा हत्ती क्र. MH-28-BB-9948) चा चालक विशाल शेळके (रा. तिघ्रा) याने मागे ट्रॅक्टर आणि माणूस उभा असल्याचा कोणताही अंदाज न घेता गाडी वेगाने रिव्हर्स घेतली. यामुळे ट्रॅक्टरला जोरात धडक बसली व ट्रॅक्टरचे चाक अविनाशच्या अंगावरून गेले. गंभीर जखमी झालेल्या अविनाशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बोराखेडी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध BNS च्या कलम १०६(१), २८१ अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सफौ अशोक आडोकार करत आहेत.
मलकापूर ग्रामीण: ‘लाडकी बहीण’ योजनेचे ई-केवायसी करण्यासाठी गेलेली महिला बेपत्ता
मलकापूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बँकेत ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी मलकापूर येथे जाते असे सांगून गेलेली ३० वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची घटना कोळी वाडा दाताळा येथे घडली आहे. सौ. आशा निवृत्ती चंडोल (रा. टिटवी, जि. संभाजीनगर, ह.मु. दाताळा) असे बेपत्ता महिलेचे नाव असून तिच्या आईने मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली आहे. महिलेची उंची ५ फूट, रंग सावळा, अंगात पिवळ्या रंगाची व लाल डिझाईनची साडी, गुलाबी ब्लाउज, कपाळावर काळी टिकली आणि गोंदलेले, पायात गुलाबी रंगाची सँडल, गळ्यात सोन्याची पोत आणि कानात रिंगा. शिक्षण ९ वी पास. या वर्णनाची महिला आढळल्यास मलकापूर ग्रामीण पोलिसांशी किंवा सपोउपनि टाकरखेडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
डोणगाव रोडवरील ‘हॉटेल शिवराज वाईंन बार’वर पोलिसांचा छापा; कुंटणखाना चालवणारे दोघे अटकेत
मेहकर: मेहकर बायपासवरील डोणगाव रोडवर असलेल्या ‘हॉटेल शिवराज वाईंन बार’ (व्हेज अँड नॉनव्हेज) येथे मेहकर पोलिसांनी छापा टाकून सुरू असलेला देहव्यापार उघडकीस आणला आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त केल्याप्रकर्णी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एका पीडित महिलेची सुटका केली आहे.
विजय विष्णू लादे (वय ३६ वर्षे) रा. संतोषी माता नगर, मेहकर आणि प्रमोद मुरलीधर धोडगे (वय ४८ वर्षे) रा. चनखोरे कॉलनी, मेहकर, अशी अटक करण्यात आलेल्या कुंटणखाना चालकांची नावे आहेत. पोलिसांच्या धाडीत घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल व इतर साहित्य. असा एकूण १० हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल केशव अवचार यांच्या तक्रारीवरून अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४, ५, ६, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नी. व्यंकटेश आलेवार स्वतः करत आहेत.
“तुला जास्त मस्ती आली आहे का?” म्हणत लोखंडी रॉडने मारहाण; ४ जणांवर गुन्हा
मलकापूर: पान्हेरा गावाजवळील पुलाजवळ किरकोळ वादातून एका शेतकऱ्याला लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. फिर्यादी अरुण श्यामराव तायडे (वय ४२ वर्षे) रा. पान्हेरा वडोदा यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भैय्या ज्ञानदेव गायकवाड, मुन्ना ज्ञानदेव गायकवाड, निलेश विजय वेरूळकर आणि अमोल विजय वेरूळकर (सर्व रा. वडोदा, ता. मलकापूर), अशी आरोपींची नावे आहेत. वाद झाला असता आरोपी भैय्या गायकवाड याने “तुला जास्त मस्ती आली आहे” असे म्हणून लोखंडी रॉडने अरुण तायडे यांच्या डाव्या हातावर प्रहार केला, तर उर्वरित तिघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस अंमलदार रामचंद्र भोपळे करत आहेत.
लोकसभा निवडणुकीचे (BLO) काम करण्यास नकार देणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल!
बुलढाणा: निवडणूक आयोगाच्या अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय कामात कसूर करणे एका शिक्षकाला महागात पडले आहे. मतदार संघ २२-बुलढाणा अंतर्गत मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) म्हणून काम करण्यास थेट नकार देणारे सहाय्यक शिक्षक शेख वसीम शेख फरीद (उर्दू हायस्कूल, बुलढाणा) यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी यांच्या आदेशानुसार, मुख्याधिकारी नगर परिषद बुलढाणा यांच्या वतीने उपमुख्याधिकारी डॉ. योगेश आत्माराम सावळे यांनी पोलिसात लेखी तक्रार दिली. राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी आरोपी शिक्षकाविरुद्ध लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार गजानन जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
