अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): वर्दीची ताकद निष्पापांना छळण्यासाठी नाही तर गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी असते, हाच संदेश देत बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी खाकीची आब राखण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. जळगाव जामोद येथील बहुचर्चित ‘सर कटी लाश’ प्रकरणातील तपासाचा उडालेला बऱ्या आणि जिल्ह्यातील अवैध धंद्यांकडे झालेले दुर्लक्ष एलसीबीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. एसपी तांबेंनी थेट चार पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात रवानगी केली असून, या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
जळगाव जामोद हद्दीतील राजुरा शिवारात २६ एप्रिल रोजी एक शिर नसलेला आणि अर्धवट जळालेला अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला. एलसीबीच्या पथकाने घाईघाईने तपास करत हा मृतदेह मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेल्या ‘शिवानी कलमेकर’ नावाच्या तरुणीचा असल्याचा निष्कर्ष काढला. शिवानीचा खून तिच्याच वडील आणि भावाने केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी त्यांना थेट जेलमध्ये टाकले होते. ज्या मुलीच्या ‘खुना’च्या आरोपाखाली कुटुंब जेलमध्ये होते, ती ‘मृत’ शिवानी २८ मे रोजी चक्क जिवंत आणि सुखरूप पोलीस ठाण्यात अवतरली! पोलिसांच्या या अजब आणि बेजबाबदार कारभारामुळे खाकी वर्दीची नाचक्की झाली. निष्पाप लोकांना गोवल्याबद्दल एसपी तांबेंनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस अंमलदार एजाज रफिक खान, अमोल रमेश शेजोळ आणि अजिस रेहमान परसुवाले या चार जणांनी तपासात गंभीर हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल त्यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली असून त्यांची रवानगी आता बुलढाणा येथील पोलीस नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. तसेच खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांना या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आहे आहे.
‘सट्टा कॅपिटल’च्या सुभेदारांनाही दणका!
केवळ चुकीचा तपासच नाही, तर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर डोळे मिटणाऱ्यांनाही एसपींनी सोडलेले नाही. चिखली आणि खामगाव परिसराला बुकींनी ‘सट्टा कॅपिटल’ बनवले असून पोलिसांच्या नाकाखाली क्रिकेट सट्टा, वरली-मटका, जुगार आणि अवैध दारू विक्री सुरू असल्याचा पर्दाफाश झाला होता. त्यामुळे एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आल्याची चर्चा आहे. या संदर्भात अधिकृत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता,माहिती मिळाली नाही.
