एलसीबी प्रमुखांसह ठाणेदाराचीही नियंत्रण कक्षात रवानगी!;तपासात हलगर्जीपणा भोवला; जळगाव जामोदचे ‘सर कटी लाश’ प्रकरण

अजय टप

बुलढाणा, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो) : तपासात निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवत पोलीस अधीक्षकांनी २९ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस अंमलदारांची तडकाफडकी उचलबांगडी केली होती. या प्रकरणाचे पडसाद आज दुसऱ्या दिवशीही उमटले. आज ३० मे रोजी पोलीस अधीक्षक तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोदचे ठाणेदार नितीन पाटील यांची देखील तडकाफडकी बुलढाणा येथील नियंत्रण कक्षात रवानगी केली आहे.
जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या राजुरा परिसरात काही दिवसांपूर्वी एक छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळला होता. पोलिसांनी योग्य तांत्रिक तपास व खात्री न करता, ही लाश एका बेपत्ता तरुणीची असल्याचे गृहीत धरले. इतकेच नव्हे तर तिच्याच वडील आणि भावावर खुनाचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली होती. या बहुचर्चित ‘सर कटी लाश’ प्रकरणाला २८ मे रोजी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक वळण मिळाले होते. ज्या तरुणीच्या खुनाच्या आरोपाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तिच्या निष्पाप वडील आणि भावाला बेड्या ठोकल्या होत्या, ती तरूणी चक्क जिवंतपणे पोलीस स्टेशनमध्ये अवतरली. पोलिसांच्या या ढिसाळ आणि घाईघाईने केलेल्या तपासामुळे संपूर्ण जिल्ह्यात खाकी वर्दीचे अक्षरशः धिंडवडे निघाले. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी २९ मे रोजी त्वरीत प्रभावाने तपास अधिकारी तथा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस अंमलदार एजाज रफिक खान, अमोल शेजोळ आणि अजिस परसुवाले यांची उचलबांगडी केली होती. या आदेशाला २४ तासांचा कालावधी पूर्ण होत नाही तोच, आज ३० मे रोजी पोलीस अधीक्षकांनी पुन्हा एका आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद ठाणेदार नितीन पाटील यांच्यावरही तपासात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्यांची रवानगी पोलीस नियंत्रण कक्षात केली आहे. पोलीस अधीक्षकांनी एकाच वेळी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख आणि ठाणेदारावर केलेल्या या धडक कारवाईमुळे पोलीस वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून, भविष्यात या प्रकरणात आणखी काही जणांवर गाडसर फिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!