बुलढाणा जिल्ह्यात खळबळ: अवघ्या दोन दिवसांत महिला व बालकांसह ९ जण बेपत्ता; ३ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

अजय टप
बुलढाणा, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत महिला आणि लहान मुले बेपत्ता होण्याच्या धक्कादायक घटनांची मालिका समोर आली आहे. पिंपळगाव राजा, धामणगाव बढे आणि बोराखेडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकूण ९ व्यक्ती अचानक गायब झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये तीन विवाहित महिला, एक तरुण मुलगी आणि ५ लहान मुलांचा समावेश आहे.
पिंपळगाव राजा पोलीस ठाणे: एकाच कुटुंबातील आईसह तीन चिमुरडे बेपत्ता
पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत नांदूरा तालुक्यातील एका गावातून एक विवाहित महिला तिच्या तीन लहान मुलांसह अचानक बेपत्ता झाली आहे. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही विवाहित महिला “मुलाला दवाखान्यातून घेऊन येते”, असे सांगून घरातून निघाली होती. तिच्यासोबत तिच्या दोन लहान मुली आणि एक दीड वर्षाचा मुलगा होता. मात्र, ती अद्याप घरी परतली नाही. परिसरात व सर्व नातेवाइकांकडे शोध घेतला असता कोणीही मिळून आले नाही. याप्रकरणी पोलिसांनी बेपत्ता झाल्याची रीतसर नोंद केली असून पुढील तपास पोलीस अंमलदार करत आहेत.
धामणगाव बढे पोलीस ठाणे: एकाच रात्री दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील महिला व मुली गायब
धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणहून दोन महिला व त्यांच्या मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षकांकडे सोपवण्यात आला आहे. पहिल्या घटनेत आई व ६ वर्षांची चिमुरडी बेपत्ता झाली. रात्रीच्या सुमारास एक महिला तिच्या ६ वर्षांच्या लहान मुलीला सोबत घेऊन घरातून कोठे तरी निघून गेली आहे. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेऊनही त्या मिळून न आल्याने अखेर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत सायंकाळच्या सुमारास एका कुटुंबातील महिला तिच्या १२ वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन “मी आईच्या घरी जाते” असे सांगून घरातून निघून गेली. मात्र, त्या दोघीही माहेरी पोहोचल्या नाहीत व बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी देखील पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
बोराखेडी पोलीस ठाणे: तरुण मुलगी अचानक बेपत्ता
बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत नांदूरा तालुक्यातील एका गावातून एक तरुण मुलगी घरातून अचानक बेपत्ता झाली असून परिसरात चिंता व्यक्त होत आहे. ही तरुणी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काहीही एक न सांगता कुठेतरी निघून गेली. तिचा गावात, आजूबाजूला व सर्व नातेवाइकांमधे शोध घेतला असता ती अद्याप मिळून आली नाही. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तोंडी रिपोर्टवरून बोराखेडी पोलिसांनी मिसिंग दाखल केली असून बिट अंमलदार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!