अजय टप
शेगाव, (हिंदवार्ता न्यूज ब्युरो): रक्षकच जेव्हा भक्षक बनतो, तेव्हा सर्वसामान्य नागरिकाने न्याय कुणाकडे मागायचा?, असाच एक गंभीर, कायदा आणि सुव्यवस्थेला पेचात टाकणारा प्रकार शेगाव येथे नुकताच समोर आला. एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या पदाचा आणि वर्दीचा कथित गैरवापर करून एका गरिबाचा सुखी संसार उद्ध्वस्त केल्याचा खळबळजनक आरोप शेगाव येथील पीडित पतीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या लेखी तक्रारीतून केला आहे.
शेगाव येथील रहिवासी असलेल्या एका ४४ वर्षीय तक्रारदाराने शेगाव शहर ठाणेदार, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (खामगाव) यांना ४ जून २०२६ रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, एका जुन्या ओळखीच्या माध्यमातून शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांचे तक्रारदाराच्या घरात येणे-जाणे सुरू झाले होते. या कौटुंबिक संबंधांचा गैरफायदा घेत आरोपी पोलीस उपनिरीक्षकाने तक्रारदाराच्या पत्नीशी जवळीक साधली. तक्रारदार मजुरीच्या कामासाठी दिवसभर घराबाहेर किंवा बाहेरगावी राहत असल्याचा फायदा घेत मागच्या ७-८ महिन्यांपासून त्यांच्या पत्नी आणि सदर पोलीस उपनिरीक्षक यांच्यात गुप्त चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल सुरू होते. १९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी तक्रारदार यांनी स्वतः आपल्या पत्नीला घरात व्हिडिओ कॉलवर रंगेहात पकडले. गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून पत्नीने तक्रारदार यांच्या हातातून मोबाइल हिसकावून घेत पाण्याच्या टाकीत टाकला आणि नंतर दगडावर आपटून फोडून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या वादामधून तक्रारदाराने आपल्या पत्नीला तिच्या माहेरी (अंत्री मलकापूर) सोडले. मात्र, दुसऱ्याच दिवशी तक्रारदार घरी नसताना त्यांच्या पत्नीने आणि सासऱ्यांनी शेगाव येथील घराचे कुलूप तोडून बेकायदेशीर घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील सोन्याचे दागिने, कपडे आणि ५० हजार रुपये रोख चोरून नेल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे.
तक्रारदार यांनी शेगाव पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असता, पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून इतर पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव आणला. त्यामुळे पोलिसांनी ही तक्रार ‘घरगुती वाद’ असल्याचे सांगून केवळ चौकशीवर ठेवून घेतली, असा आरोपही तक्रारदाराने केला आहे. उलटपक्षी, पीडित पतीला अधिक त्रास देण्यासाठी अकोट येथील महिला दक्षता समितीमध्ये तक्रारदार यांच्याविरुद्ध एक खोटी तक्रार दाखल करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
पोलीस उपनिरीक्षकांकडून धमकी
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पीडित पती यांनी आरोपी पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा शिंदे याने थेट कायद्याची भाषा बाजूला ठेवून गुंडशाहीच्या भाषेत धमकावत तुझी पत्नी मी सांगेन तसेच करेल व तू जास्त चौकशी करशील तर तुला खाकी वर्दीचा झटका दाखवेन. मी गडचिरोली येथे नक्षलवादी थंडे केलेले आहेत, मी शेगाव शहरातील रथीमहारथी थंडे केले आहेत, तू काय चीज आहेस?, अशा धमक्या दिल्या. तसेच पीडिताच्या संसाराची राखरांगोळी केली, असा आरोप तक्रारीत आहे.
कडक कारवाईची मागणी
आरोपी पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांचा मोबाइल डेटा आणि व्हॉट्सॲप चॅट रेकॉर्ड्सची सखोल सायबर तपासणी करण्यात यावी, जेणेकरून या अनैतिक संबंधांचे आणि दबावाचे सत्य समोर येईल तसेच, भविष्यात स्वतःला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना काही बरे-वाईट झाल्यास, त्याला संपूर्णपणे पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे हेच जबाबदार असतील, असेही त्यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे. पोलीस प्रशासन आपल्याच विभागातील अधिकाऱ्यावर काय कारवाई करते आणि या पीडित पतीला न्याय मिळवून देते का? याकडे आता संपूर्ण शेगाव तालुक्याचे लक्ष लागले आहे.
