अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): गेल्या २४ तासांत शेगाव आणि खामगाव शहर व ग्रामीण भागात गुन्हेगारीच्या गंभीर घटना समोर आल्या आहेत. शेगावच्या म्हाडा कॉलनीत दोन गटात चाकू आणि विटांनी रक्तरंजित हाणामारी झाली असून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे, लग्नाचा नकार दिल्याने एका कुटुंबाला काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. यासोबतच एक अपघाताची घटना आणि एक तरुणी बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.
शेगाव म्हाडा कॉलनीत दोन गटात तुंबळ हाणामारी; चाकू आणि विटांचा मुक्त वापर, परिसरात दहशत
शेगाव शहर: येथील म्हाडा कॉलनी परिसरात ८ जून रोजी रात्री ८ ते ८:३० च्या सुमारास दोन शेजारील गटांमध्ये जुन्या वादातून भीषण हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही बाजूचे लोक गंभीर जखमी झाले असून शेगाव शहर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
बावनबीर येथील मजूर दशरथ महादेव करणकार (वय ३० वर्षे) हे म्हाडा कॉलनीतील त्यांच्या मावसबहीण आणि आईला आरोपी यशवंत तायडे, अर्जुन तायडे, अनिता तायडे व दुर्गा सावळे मारहाण करत असताना वाचवण्यासाठी गेले. यावेळी आरोपी अर्जुन तायडे याने त्याच्या जवळील चाकूने दशरथ यांच्या डोक्यावर, डाव्या हातावर आणि बरगडीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. तसेच इतर आरोपींनी काठ्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सुरेंद्रसिंग चव्हाण हे करत आहेत. तर याच घटनेत दुसऱ्या बाजूचे फिर्यादी अर्जुन प्रल्हाद तायडे (वय ४५ वर्षे) यांनी तक्रार दिली की, ते घरी जात असताना आरोपी रुख्माबाई तायडे, दशरथ करणकार, सहादेव करणकार, मुकेश सावळे आणि महादेव वानखडे यांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्यांना अडवले. आरोपी दशरथने रस्त्यावरील वीट उचलून त्यांच्या डोक्यावर मारली, तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना रक्तबंबाळ केले. एवढेच नव्हे तर आरोपींनी त्यांच्या घरावर जोरदार दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या आणि कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
“माझ्या मुलाशी लग्न का ठरवले नाही?” खामगावात पुतणीच्या लग्नाचा नकार भोवला; कुटुंबावर काठ्यांनी हल्ला
खामगाव ग्रामीण: पुतणीचे लग्न आरोपीच्या मुलासोबत न ठरविल्याचा राग मनात धरून एका कुटुंबावर शेजाऱ्यांनीच जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना आवार (ता.खामगाव) येथे घडली.
८ जून रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास रामेश्वर नामदेव काळे (वय ५० वर्षे) यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. आरोपी प्रकाश किसन टाले, धीरज प्रकाश टाले आणि रोशन प्रकाश टाले (सर्व रा.आवार) यांनी संगणमत करून रामेश्वर काळे, त्यांचा भाऊ आणि सुनेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, वैद्यकीय अहवालाच्या आधारे खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बाळकृष्ण फुंडकर हे करत आहेत.
‘हिट अँड रन’: अज्ञात काळ्या कारच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी, चालक फरार
खामगाव ग्रामीण: आवार बस स्टॉप ते खामगाव रोडवर ८ जून रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास एक ‘हिट अँड रन’ची घटना घडली. शेख फारुख शेख साबीर (वय ५० वर्षे) रा.आवार हे आपल्या दुचाकीने क्रमांक एमएच-३०-वाय-४०६६ खामगावकडे जात असताना, मागून आलेल्या एका भरधाव काळ्या रंगाच्या अज्ञात कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात शेख फारुख हे गंभीर जखमी झाले असून दुचाकीचे अंदाजे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघात घडवून कार चालक घटनास्थळावरून कारसह पळून जाण्यात यशस्वी ठरला. फिर्यादी शेख शाकीर शेख जाबीर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
कॉलेजला प्रॅक्टिकलसाठी गेलेली १९ वर्षीय तरुणी बेपत्ता
शेगाव ग्रामीण: शेगाव तालुक्यातील सगोडा येथील एक १९ वर्षीय तरुणी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ८ जून रोजी सकाळी ८ वाजता वैष्णवी ‘सिध्दीविनायक कॉलेज लासुरा’ येथे प्रॅक्टिकल परीक्षेसाठी जाते असे सांगून घरातून निघाली होती, मात्र ती परतलीच नाही. नातेवाईकांनी कॉलेज परिसर, आजूबाजूची गावे आणि शेगाव शहरात तिचा कसून शोध घेतला, परंतु तिचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर वडील विनायक ज्ञानदेव बाठे (वय ५० वर्षे) यांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन गाठून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस अंमलदार अतुल आगलावे हे करत आहेत.
