नगरसेवकाच्या व्हायरल ऑडिओ प्रकरणी गुन्हा दाखल : राजकीय व सामाजिक चर्चांना उधाण

अजय टप

मलकापूर,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो) : मलकापूर शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले असून AIMIM पक्षाचे नगरसेवक शेख इमरान शेख गुलाब याच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 196(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, 13 जून रोजी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेल्या वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी मनोजकुमार उमाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, मलकापूर शहरात तीव्र पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांकडून नियमित पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी निवेदने, मोर्चे व आंदोलने करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत शहराच्या विस्तारित भागात नव्या पाईपलाईनचे काम सुरू असल्याने काही नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर विविध सामाजिक माध्यमांवर शहरातील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून जनआंदोलनाचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने वातावरण अधिक तापले असून या प्रकरणाला जातीय रंग मिळू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.

सध्या शहरातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये तीव्र भावना व्यक्त होत असल्या तरी शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!