अजय टप
बुलढाणा,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): बुलढाणा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांतर्गत गंभीर घटना समोर आल्या आहेत. यामध्ये नर्सिंग, बीएससी आणि फार्मसीचे शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थिनींसह एकूण चार महिला बेपत्ता झाल्याच्या नोंदी पोलीस दप्तरी झाल्या आहेत. तर दुसऱ्या एका घटनेत शौचालय खड्ड्याच्या मातीवरून झालेल्या वादात शेजाऱ्यांनी पती-पत्नीला लाकडी काठीने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
बुलढाणा शहर: नांदुरा तालुक्यातील एक १९ वर्षीय तरुणी बुलढाणा येथील नामांकित कॉलेजमध्ये नर्सिंगचे द्वितीय वर्ष शिक्षण घेत आहे. २४ जून रोजी वसतीगृहाला सुटी झाल्याने ती घरी जाण्यास निघाली होती. तिने दुपारी वडिलांना फोन करून “मी बुलढाणा बस स्थानकावर असून बसमध्ये बसत आहे” असे सांगितले. मात्र, ती घरी पोहोचली नाही आणि तिचा मोबाईलही बंद झाला. वडिलांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार दत्तात्रय नागरे हे करीत आहेत.
चिखली: चिखली तालुक्यातील सावरगाव परिसरातील एक १९ वर्षीय तरुणी चिखली येथील महाविद्यालयात बीएससीचे शिक्षण घेत आहे. २४ जून रोजी सकाळी तिचे वडील तिला ‘श्री शिवाजी महाविद्यालय, चिखली’ येथे पेपर देण्यासाठी सोडून आले होते. पेपर सुटल्यानंतर वडील तिला घेण्यासाठी गेले, मात्र ती कॉलेजबाहेर आली नाही. कॉलेज परिसर व नातेवाईकांकडे शोध घेऊनही ती मिळून आली नाही. चिखली पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील पोलीस अंमलदार गजानन काकडे करीत आहेत.
बुलढाणा शहर: मूळची जालना येथील रहिवासी असलेली ३२ वर्षीय विवाहिता कौटुंबिक वादामुळे एप्रिल महिन्यापासून बुलढाणा येथे आपल्या माहेरी राहत होती. २४ जून रोजी घरचे सर्व सदस्य कामासाठी बाहेर गेले असताना ती कोणालाही काही न सांगता आपली बॅग व कपडे घेऊन घरातून निघून गेली. तिचा फोनही बंद येत आहे. भावाच्या रिपोर्टवरून बुलढाणा शहर पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार प्रकाश बाजड करीत आहेत.
मेहकर: लोणार तालुक्यातील २२ वर्षीय तरुणी मेहकर येथील सत्यजीत कॉलेजमध्ये बी.फॉर्मच्या अंतिम वर्षाला शिकत होती आणि तेथेच भाड्याने खोली घेऊन राहत होती. २४ जून रोजी ती ‘घरी जाते’ असे रूम मालकाला सांगून निघाली, मात्र ती घरी पोहोचली नाही. वडिलांनी सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मेहकर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस अंमलदार सुखदेव ठाकरे हे करीत आहे.
रायपूर: फिर्यादी सुहास भोसले यांनी त्यांच्या जागेत संडाससाठी खड्डा खोदला होता. या खड्ड्याची माती शेजारी राहणाऱ्या आरोपींच्या जागेत पडल्याच्या कारणावरून २२ जून रोजी दुपारी वाद झाला. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण केली. फिर्यादीची पत्नी सोडवण्यासाठी आली असता, महिला आरोपीने तिचे केस ओढून खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच यापुढे आमच्या नादाला लागलात तर जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली. रायपूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार आशिष काकडे हे करीत आहेत.
