धाडमध्ये दुचाकी चोरट्या टोळीचा पर्दाफाश;चोरीच्या तब्बल १५ दुचाकी जप्त!; छत्रपती संभाजीनगर क्राइम ब्रँचची कारवाई

अभिनय बोर्डे

धाड,(हिंदवार्ता न्यूज ब्युरो): छत्रपती संभाजी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड परिसरामध्ये धाडसी मोहीम राबवून आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. २५ जूनच्या रात्री धाड येथे दाखल झालेल्या या विशेष पथकाचे सर्च ऑपरेशन आज २६ जूनच्या रात्रीपर्यंत अत्यंत गोपनीय आणि वेगाने सुरू होते. या २४ तासांच्या अखंड आणि थरारक कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल १५ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहे.

छत्रपती संभाजी नगर येथील दुचाकी चोरट्यांची एक सक्रिय टोळी शहराच्या विविध भागांतून दुचाकी चोरायची. या चोरलेल्या गाड्या गजानन फकीरा जाधव (रा. रांजणगाव) हा धाड येथील समीर शेख याच्याकडे द्यायचा. धाड परिसरातील काही स्थानिक चोरटे आणि एजंटच्या माध्यमातून ह्या दुचाकी सर्वसामान्यांना अगदी स्वस्त दरात विकल्या जायच्या. ग्राहकांना कमी पैशांचे आमिष दाखवून हा काळाबाजार गेल्या काही दिवसांपासून जोरात सुरू होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेला याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळताच त्यांनी धाडमध्ये वेगाने चक्र फिरवून या रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.

या संपूर्ण शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना चोरट्यांच्या एका अजब आणि चक्रावून टाकणाऱ्या अजब कार्यपद्धतीचा शोध लागला. या टोळीतील एक सराईत चोरटा चोरी केलेल्या दुचाकी थेट गावालगतच असलेल्या एका विहिरीच्या पाण्यात टाकून लपवून ठेवायचा! पोलिसांना किंवा इतर कोणाला शंका येऊ नये म्हणून ही शक्कल लढवण्यात आली होती. जेव्हा जेव्हा दुचाकीसाठी एखादा ग्राहक तयार व्हायचा, तेव्हा हा चोरटा विहिरीतून ती दुचाकी बाहेर काढायचा आणि ग्राहकाला विकायचा. पोलिसांनी संशयितांच्या चौकशीनंतर विहिरीच्या पाण्यात बुडवून ठेवलेल्या काही दुचाकी सापडल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!